नेत्यांना गावबंदी करायला, महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांना सवाल

‘चार दोन पोर नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे पोस्टर लावतात. आमदारांना गावबंदी, खासदारांना गावबंदी. मंत्र्यांना गावबंदी. महाराष्ट्र काय तुमच्या सातबारावर लिहून दिलाय का? गावबंदी करणारे फलक तात्काळ काढले पाहिजेत. सरकारने पक्षपात केला तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे की नाही?’ असे म्हणत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अंबड येथे शुक्रवारी ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा झाला. या मेळाव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुरुवातीला पाच हजार असलेल्या कुणबी नोंदी अचानक कशा काय वाढल्या? हे सर्व ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंतरवालीत झालेल्या लाठीहल्ल्यावरून झालेल्या राजकारणावरही त्यांनी बोट ठेवले. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचले, असे भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीही जागवल्या.

दगडाला शेंदूर फासला
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावरही छगन भुजबळ यांनी तुफान हल्ला चढवला. हे उपोषण कुणाच्या पाठबळाने सुरू झाले आणि संपले, हे राज्यातील जनतेसमोर आले पाहिजे. लाठीहल्ला झाल्यानंतर हे सरदार एका घरात जाऊन बसले. त्यानंतर पहाटे तीन वाजता त्यांना पुन्हा कोणी आणून बसवले हे सर्वांनी पाहिले आहे. आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याचे सांगितले, गेले पण त्यावेळी झालेल्या दगडफेकीत ७० पोलीस जखमी झाले होते, त्यांच्याबद्दल कोणाला मायेचा पाझर फुटला नाही, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

होय, आजही बेसन भाकरी खातो…
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगन भुजबळ दोन वर्षे जेलात बेसन भाकरी खाऊन आल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी ‘मी आजही बेसन भाकरी खातो, सासर्‍याच्या घरी तुकडे मोडत नाही!’ असा पलटवार केला. आरक्षण काय ते अगोदर समजून घ्या आणि मग आरक्षणाची मागणी करा, असेही ते म्हणाले. बीडमधील हिंसाचार कुणाच्या इशार्‍यावर झाला याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

कृष्ण हा यादव म्हणजेच ओबीसी
कार्तिकी एकादशीच्या महापुजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना येऊ देणार नाही अशा वल्गना केल्या जात आहेत. आता देवानांही जाती लावण्यात येत आहेत. पंढरपुरचा राजा हा साक्षात कृष्णाचा अवतार. कृष्ण हा यादव म्हणजेच ओबीसी. संत चोखामेळा, संत नामदेव अशा कितीतरी ओबीसींनी विठोबाची पुजा केली आहे, असा टोला भुजबळ यांनी महापुजेला विरोध करणारांना लगावला.