काकांना लढायचं तर लढू द्या, मी तयार आहे! बिहारमध्ये चिराग पासवान आणि पशुपतीनाथ आमने-सामने

बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून काका-पुतण्या एकमेकांविरोधात लढणार आहेत. लोक जनशक्ती पार्टी (आर)चे नेते चिराग पासवान हे त्यांचे काका पशुपतीनाथ पासवान यांच्याविरोधात लढणार आहेत. काकांना निवडणूक लढवायची असेल तर लढवू द्या. मी तयार आहे, असे आव्हान चिराग यांनी काका पशुपतीनाथ यांना दिले आहे.

लोक जनशक्ती पार्टीचे नेते राम विलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू पशुपतीनाथ यांनी पक्षात फूट पाडून पक्ष बळकावला आणि चिराग यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर चिराग यांनी लोक जनशक्ती पार्टी (आर) ची स्थापना केली. त्यांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएकडून पाच जागांचे तिकीटही मिळवले. मात्र, एनडीएने पशुपतीनाथ यांचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष असूनही त्यांना लोकसभेचे एकही तिकीट दिले नाही. त्यामुळे एनडीएमधून बाहेर पडत नुकतेच पशुपतीनाथ यांनी हाजीपूर मतदारसंघातून ‘इंडिया’ आघाडीकडून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे.

मी एनडीएकडून हाजीपूरसाठी लढणार आहे. काका किंवा कोणीही उमेदवार माझ्यासमोर असेल तर अशा कोणत्याही आव्हानाचा सामना करायला तयार आहे. मला वडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे. बिहारच्या राजकारणाला माझी प्राथमिकता असेल, असे चिराग यांनी स्पष्ट केले.