कॉमेडियन नवीन प्रभाकर 15 वर्षांनी रंगभूमीवर  

पैचान कौन या पंचलाइनचा जनक, प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट नवीन प्रभाकर 15 वर्षांनी रंगभूमीवर त्यांचा कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांच्या कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर या नव्या कॉमेडी शोचा आठवा प्रयोग नुकताच बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात पार पडला. कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर या कॉमेडी शोच्या निमित्ताने नवीन प्रभाकर 15 वर्षांनी आपल्या खुमासदार शैलीमधे स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण करत आहे.  

या कार्यक्रमाला 900 पेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती लाभली. प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह हास्याच्या गडगडाटाने आणि टाळय़ांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. या लाइव्ह शोमध्ये नवीन प्रभाकरसोबत नितीन भांडारकर आणि राजकुमार जावकर म्हणजेच राजकुमार रँचो या स्टँडअप कॉमेडियन्सनी देखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या लाइव्ह कार्यक्रमाची संकल्पना नवीन प्रभाकर यांची असून प्रयास एंटरटेन्मेंटचे प्रतीक मेहता हे मुख्य निर्माता व स्वरूप स्टुडिओ हे क्रिएटिव्ह व कार्यकारी निर्माता आहेत. 

कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी नवीन प्रभाकर सांगतो, ‘‘या कार्यक्रमाचे माध्यम हे पूर्णपणे हिंदी आहे, पण कार्यक्रमाला ज्या भाषिक माध्यमाचा प्रेक्षक लाभेल त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण करतो. मराठी प्रेक्षक असेल तर अर्ध्या तासाचे मराठीतून सादरीकरण करतो. गुजराती असेल तर आम्ही गुजरातीतूनच सादरीकरण करतो. बॉलीवूड मिमिक्री, डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालू घडामोडींवर विनोदी पद्धतीने भाष्य असे या शो चे स्वरूप आहे. त्यामुळे माझा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी फक्त हास्याची पर्वणी नसून ताणतणाव दूर करून मनशांती देणारे अनोखे पॅकेज आहे.’’  

सोशल मीडियावर कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकरकॉमेडी शोचा टीझर दिसेलच, पण हास्यांची कारंजी उडवणारा हा संपूर्ण शो फक्त रंगभूमीवर पाहता येईल. नवीन प्रभाकर यांचे कार्यक्रम ओटीटी शो व टेलिव्हिजन वर पाहिले गेले आहेतच परंतु प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा त्यांचा असा कार्यक्रम पहिल्यांदाच थिएटरमध्ये सादर होत आहे.