निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक, काँग्रेसला घातपाताचा संशय

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार दौऱयावर असताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात नाना पाटोले सुखरूप बचावले असले तरी निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मागे-पुढे सुरक्षा असतानासुद्धा असा हा अपघात घडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने घातपाताचा संशय व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चलकास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीचे भंडारा लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांचा प्रचार आटोपून नाना पटोले हे सुकळी या स्वगावी परत जात होते. त्या वेळी भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ त्यांच्या गाडीच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱया एका अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीच्या मागच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने त्यांच्या गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर नाना पटोलेंनी स्वतः याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थाळी धाव घेत पुढील कारवाई केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांत संताप

या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपात असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. नाना पाटोले यांनी डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारीला आपल्या अस्तित्वाची लढाई मानत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. यामुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यातून हा घातपात घडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

विरोधी नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायचीय का?

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायचीय का? नाना पटोले यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का, अशी शंका असल्याचे काँग्रेस प्रवत्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

फडणवीसांकडून पटोलेंची विचारपूस

अपघाताची माहिती मिळताच मी स्वतः नाना पटोलेंना पह्न करून त्यांची विचारपूस केली. त्या वेळी त्यांनी मला सांगितलं की, अपघात मोठा असून त्यातून मी सुखरूपपणे बचावलो. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चौकशीची मागणी

या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तसेच निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन सदर घटनेची सर्वंकष चौकशी करावी. भंडारा जिह्यातील घटना पाहता भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये याची खबरदारी घेऊन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, असे लोंढे यांनी म्हटले आहे.