Corona : अयोध्येत विदेशी पर्यटकांकडून कोरोनाचा धोका, रामनवमीनिमित्त प्रशासन अलर्ट मोडवर

रामनवमीनिमित्त अयोध्या पूर्णपणे सजली आहे. या उत्सावाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. प्रभू श्रीरामाची भव्य मंदिरात प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिली रामनवमी असल्याने देश-विदेशातून भक्त येणार आहेत. अशावेळी कोरोनाचा धोका लक्षात घेत विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना 14 दिवस क्वारंटाईन वॉर्डमध्ये राहावे लागेल.

जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण प्रकाश श्रीवास्तव म्हणाले की, ‘कोविड-19 चा सामना करण्यासाठी आम्हाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. आम्ही सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात 4 विशेष क्वारंटाईन वॉर्ड तयार केले आहेत. त्यात कोरोनाबाधित विदेशी पर्यटकांना ठेवण्यात येणार आहे.’

17 एप्रिल रोजी रामनवमी आहे. या काळात कोणत्याही विदेशी भाविकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना 14 दिवस क्वारंटाईन वॉर्डमध्ये राहावे लागेल. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, ‘कोविड -19 ची रुग्णवाढ टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.’