क्रेडिट कार्ड लिमिटच्या नावाखाली करायचा फसवणूक

क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून देण्याच्या नावाखाली नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारणाऱया ओंकार दुबेला अंधेरी पोलिसांनी अटक केली.

तक्रारदार याचा अंधेरी येथे मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. मे महिन्यात ते अंधेरी मेट्रो स्थानक येथून घरी जात होते. तेव्हा क्रेडिट कार्डवर ऑफर आहे असे सांगून त्याने व्यावसायिकांना स्टॉलजवळ नेले. त्यानंतर त्याने व्यावसायिकाचा नंबर आणि दुसऱया बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली. तुमच्या कार्डवर कोणतीही ऑफर नाही अशा त्याने भूलथापा मारल्या. काही वेळाने त्याने व्यावसायिकाच्या मोबाईलवर फोन केला. तुमच्या कार्डचे लिमिट वाढवले असल्याचे सांगून त्यांना पुन्हा बोलावून घेतले. जून महिन्यात व्यावसायिकांना बँकेचे स्टेटमेंट आले. तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रणजित गुंडरे, मोनिका गोम्स, नीलम लब्दे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना दुबेची माहिती मिळाली. दुबे हा अंधेरी मेट्रो स्थानकात असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी दुबेला अटक केली. दुबेने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास अंधेरी पोलीस करत आहेत.