माजी नौसैनिक अधिकाऱ्याला लावला चुना

वीज बिल अपडेटच्या नावाखाली सायबर ठगाने माजी निवृत्त नौसैनिकाला साडेआठ लाख रुपयांना चुना लावला आहे. फसवणूकप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे माजी निवृत्त नौसैनिक अधिकारी आहेत. ते जोगेश्वरी परिसरात राहतात. नुकताच त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. आपले वीज बिल भरले नाही तर विजेचे कनेक्शन कापले जाईल असे त्यात नमूद होते. त्या मेसेजखाली एक नंबरदेखील होता. भीतीपोटी त्याने त्या नंबरवर फोन केला. ठगाने आपण वीज कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवले.

आपण भरलेले विजेचे बिल अपडेट झाले नाही. त्यासाठी 100 रुपये भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी 100 रुपये एका खात्यात भरले.

पैसे भरल्यावर ठगाने त्यांना क्विक सपोर्ट ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्या वीज कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरण्यास सांगितले. क्विक सपोर्ट ऍपमुळे नौदल अधिकारी हे काही ऑनलाइन व्यवहार करत होते, ते ठग पाहत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने फोन कट केला. फोन कट केल्यावर त्यांच्या खात्यातून साडेआठ लाख रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.