दिल्ली डायरी – ‘जादू’ कोणाची; गेहलोत की मोदींच्या पत्राची?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू पुन्हा दिसणार की पंतप्रधानांनी पाठविलेल्या भावनिक पत्राची? याचे उत्तर ईव्हीएम मशीन्समध्ये एव्हाना बंद झाले आहे. ते तीन डिसेंबरला मतमोजणीनंतर कळेल. मात्र पंतप्रधानांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा भावनिक पत्राची गरज का भासावी? हा खरा प्रश्न आहे आणि तो ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या दर्जाचा आहे. राजस्थानात कोणाची फेस व्हॅल्यू महत्त्वाचे ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशसह पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता स्वतःच्या ‘फेस व्हॅल्यू’वर निवडणुका जिंकण्याची मोठी रिस्क पंतप्रधानांनी पत्करली आहे. राजकारणात अशा रिस्क घ्याव्या लागतात. मोदींनी त्या अनेक वेळा घेतल्या आणि त्याचा अनपेक्षित लाभही त्यांना झाला. मात्र या वेळची स्थिती थोडी नाजूक आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम या राज्यांत कां@ग्रेस सत्तेत येईल तर तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव आपली खुर्ची बळकट करतील, अशी स्थिती आहे. या परिस्थितीत राजस्थानचे वाळवंट हेदेखील भाजपला विजयाचे ‘मृगजळ’ भासत आहे. किमान एक राज्य जिंकले तरी मोदींची प्रतिष्ठा टिकेल असा यामागचा अंदाज आहे. भाजपच्या व मोदींच्या या प्रयत्नांना कॉंग्रेसमधील अशोक गेहलोत व सचिन पायलट हा वाद हातभारच लावत आहे. त्यामुळेच ‘म्हारी राम राम’ करत पंतप्रधानांनी थेट राजस्थानी जनतेच्या काळजाला हात घातला आहे.

राजस्थानात भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार वसुंधराराजेंना अडगळीत टाकत नरेंद्र मोदींनी ‘कमल का निशान ही हमारा चेहरा’, अशी घोषणा करत विधानसभा निवडणुकीत आडमार्गाने राजकुमारी दिव्याकुमारी यांना वसुंधरा यांची रिप्लेसमेंट म्हणून मैदानात उतरवले. दिव्याकुमारी हा तसा ग्लॅमरस चेहरा आहे. दिव्याकुमारी यांच्या प्रेमविवाहावर बॉलीवूडमध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकांत अनेक सिनेमे निघाले. त्याचा फायदा भाजपला होईल हा धोरणी हिशेबही त्यामागे होता. मात्र ना दिव्याकुमारींच्या प्रचार सभांना गर्दी झाली ना पंतप्रधानांच्या. त्यामुळेच राजस्थानही जिंकता येते की नाही, याबाबत भाजप वर्तुळात साशंकता आहे. भाजपची संपूर्ण भिस्त ही गेहलोत-पायलट यांच्यातील सुंदोपसुंदीवर आहे. गेहलोतांनी ही निवडणूक पूर्णपणे हातात घेतल्यामुळे पायलट पंपू वर्ल्ड कपच्या मॅचेस पहाव्यात, अशा तटस्थ पद्धतीने निवडणुकांकडे ‘प्रेक्षक’ म्हणून पाहतो आहे. त्यातच गेहलोत यांनी ‘हर क्षेत्र में अशोक गेहलोत चुनाव लड रहा है, ये समझकर वोट दे’, असे जनतेला आवाहन केले आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील चाणक्यांनी अनेकदा ‘ऑपरेशन लोटस’चे फासे टाकूनदेखील गेहलोतांनी सक्षमपणे राजस्थानातले सरकार चालवले. अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. त्याचा फायदा कॉंग्रेसला होताना दिसत आहे. त्यामुळेच गेहलोतांनी पक्षाऐवजी आपली फेस व्हॅल्यू पणाला लावली आहे. गेहलोत यांच्या लोकप्रियतेचा अंदाज असल्यानेच पंतप्रधानांनी राजस्थानात वेगवेगळे डावपेच टाकून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानातील धार्मिक दंगली, लाल डायरी, गेहलोतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे हे मुद्दे बनवून पंतप्रधान गेहलोत यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेहलोत हे नुसते पेशानेच जादूगार नाहीत, राजकारणातही जादूगार आहेत. त्यांच्या जादूपुढे ‘मोदी मॅजिक’ फिके पडणार का? अर्थात त्याचे उत्तर 3 डिसेंबरलाच कळेल.

वरुण गांधींची ‘करुण’ कविता…

भाजप खासदार वरुण गांधी मध्यंतरी त्यांचे चुलत बंधू राहुल यांना केदारनाथ मंदिरात भेटले. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी वरुण सध्या चर्चेत आहेत ते त्यांनी केलेल्या एका कवितेमुळे. लिखाण हा वरुण यांचा आवडता छंद असून राजकारणासारख्या धकाधकीच्या क्षेत्रात असूनही त्यांनी हा छंद जोपासला आहे हे काwतुकास्पदच म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशच्या राजकारणात योगींचा उदय होण्यापूर्वी वरुण हे भाजपच्या हिंदुत्वाचे पोस्टरबॉय होते. मात्र दिल्लीकरांशी त्यांचे सूत न जुळल्याने वरुण व त्यांच्या मातोश्री मनेका यांना दिल्लीकरांनी पद्धतशीरपणे अडगळीत टाकले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या मायलेकांना तिकीट मिळेल की नाही? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. संधी मिळाल्यावर वरुण गांधी आपल्या सरकारवर टीका करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक संधी त्यांनी कवितेद्वारे साधली आहे. ‘तुम्हारी मोहब्बत में हो गये फना… मांगी थी नोकरी मिला दाल, आटा और चना…’ ही कविता सुल्तानपूर या आपल्या मतदारसंघात म्हणून वरुण यांनी पेंद्र सरकारच्या ‘मुफ्त राशन’ योजनेची खिल्ली उडवली आहे. योगी सरकारनेही मोफत डाळीची योजना राबविली होती. त्याचाही समाचार वरुण यांनी या कवितेद्वारे घेतला आहे. वरुण यांची कविता बोचणारी आहे. कोणत्याही देशातली 80 कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते हे खचितच अभिमानाचे लक्षण नाही. मात्र केंद्रीय सरकार आपल्या छातीवर हे अभिमानाचे बिरूद मिरवत फिरत आहे.