Lok Sabha Election 2024 : भाजपचे दिवस फिरले, आउटगोइंग सुरू! धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षाला रामराम

ऐन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून आउटगोइंग सुरू झाले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निबाळकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. अशातच गुरुवारी त्यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तेव्हापासून ते मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याच्या शंकांना बळ मिळाले. शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती, मात्र रात्री त्यांनी भाजपला रामराम करण्याचा निर्णय जाहीर केला. एक पत्रक काढत त्यांनी आपण भाजप सोडत असल्याचे म्हटले.

राजीनामा देताना काय म्हटले?

मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.

आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती

आपला
धैर्यशील मोहिते पाटील

वर्तुळ पूर्ण होणार?

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते पाटलांचे राजकीय वर्तुळ पूर्ण होणार आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.