वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त, वीज वितरण सुरळीत करण्याची केली मागणी

आंबेगाव तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर शेती पिकाला फटका बसत आहे, त्याच बरोबर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजने वर होत असल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये तक्रार घेऊन येत असल्याने वादही निर्माण होऊ लागले आहे. वीज वितरण कंपनी आठ ते दहा तास वीज देण्याऐवजी तीन ते चार तास वीज पुरवत असल्याने गावाला पाणी पुरवठा करायचा कसा असा प्रश्न अनेक ग्रामपंचायती पुढे निर्माण झाला आहे.

काठापूर बु।। 220 केव्हिएला लोणीकंद येथून वीजपुरवठा केला जात आहे. लोणीकंद हे ग्रामीण भागात शेतीसाठी व औद्योगीक भागासाठी वीजपुरवठा करणारे मोठे वीज केंद्र आहे. या मुख्य वीज केंद्रावरून फक्त ग्रामीण शेतीसाठी असणारे भारनियमन केले जाते व औद्योगीक वीज पुरवठा सुरळीत ठेवला जातो. मात्र ग्रामीण भागच या भारनियमनाचा बळी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या शेतीला आठ तास वीज उपलब्ध करून देण्याचे धोरण असताना आठ तासा पैकी शेतकऱ्यांना चार तास सुद्धा वीज उपलब्ध होत नाही. वीज आल्यावर आठ तासांमध्ये वीस ते पंचवीस वेळा वीज गायब होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, त्या बरोबर वीज पंप देखील नादुरुस्त होतात. बहुतांश गावांची पाणी पुरवठा योजनेची वीज ही शेती पंपाच्या विजे बरोबरच असते त्यांना अत्यावश्यक बाब म्हणून वेगळे फिडर केले नसल्याने तालुक्याच्या पूर्व भागात एकीकडे मोठ्या प्रमाणावर टँकरची मागणी वाढत असताना ज्या गावात पाणी उपलब्ध आहे, त्या गावांना वीज वितरण कंपनीच्या नेहमीच एकच फिडरची वीज बंद करण्याच्या चुकीच्या पद्धतीने पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेवर संक्रांत आली आहे.

याप्रकरणी अवसरी बुद्रुक सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे प्रशांत वाडेकर, संजय हिंगे यांनी वीज वितरण कंपनीने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळेत वीज उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे.

या बाबत जुन्नर आंबेगाव वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले वीज कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे अचानक भारनियमन करावे लागत आहे, मात्र एकाच विभागाचे कायम भारनियमन न करता सर्वच भागात बदलून भारनियमन करावे या साठी आमची बैठक चालू आहे, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे फिडर करण्याचे आमचे चालू आहे लवकरात लवकर ते मार्गी लागेल.