उत्तीर्ण होऊन आठ महिने उलटले तरी विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत; तासगावकर कॉलेजविरोधात युवासेनेची विद्यापीठाकडे तक्रार

कर्जत येथील तासगावकर अभियांत्रिकी कॉलेजविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. उत्तीर्ण होऊन आठ महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाच मिळालेली नाही.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सातव्या आणि आठव्या सत्राची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र कॉलेजने विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने उत्तीर्ण असूनही त्यांना गुणपत्रिकाच मिळालेली नाही. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी या प्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना निवेदन दिले आहे. महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊन आठ महिने लोटले; परंतु अजूनही त्यांना गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत, असे यात म्हटले आहे.

वर्ष 2018 मध्ये व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोणत्याही कॉलेजच्या हलगर्जीपणामुळे अथवा कामचुकारपणामुळे कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल जाहीर करून गुणपत्रिका देण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणात अथवा नोकरीत अडचणी येणार नाहीत. त्यानुसार विद्यापीठाने तासगावकर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका तातडीने वितरित कराव्यात तसेच कागदपत्रांची पूर्तता न करणाऱया कॉलेजवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.