निवडणूक आयोग भाजपधार्जिणा; ममता बॅनर्जी यांचा थेट आरोप

मी शेतकऱ्यांसाठी 26 दिवस उपोषण केले आहे. आता माझ्या राज्यात एक जरी दंगल झाली तर भाजपची बाजू घेणाऱया निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर मी 55 दिवस ठाण मांडून उपोषणाला बसेन, असे थेट आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी प्रचारादरम्यान दिले.

निवडणूक आयोग सातत्याने भाजपची बाजू घेत आहे, असा आरोप त्यांनी अलीपूरद्वार येथे एका सभेत केला. निवडणूक आयोगाने भाजपच्याच इशाऱ्यावरून मुर्शिदाबादच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना हटवल्याचा दावा त्यांनी केला. इथले डीआयजी आयोगाने भाजपच्या सांगण्यावरून बदललेत. आता मुर्शिदाबाद आणि मालदा येथे दंगल झाली तर त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल. भाजपला दंगल आणि हिंसाचार घडवण्यासाठीच येथील पोलीस अधिकारी बदलायचे होते. जर एकही दंगल झाली तर आयोग त्यासाठी जबाबदार असेल; कारण येथील कायदा आणि सुव्यवस्था आता त्यांच्या अखत्यारीत आहे, असे त्या म्हणाल्या.

55 दिवस उपोषणाचा इशारा
जर मी सिंगूरमधील शेतकऱ्यांसाठी 26 दिवस उपोषण करू शकते, तर मी तुमच्या निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर 55 दिवस उपोषणही करू शकते, असा इशाराच ममता यांनी दिला. विरोधकांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याबद्दल बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली.

– आमचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या चॉपरची झडती घेतली, पण काहीही सापडले नाही. अशा गोष्टींमध्ये भाजपचा हात आहे; पण भाजप नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासण्याचे धाडस आयटी अधिकारी करतील का, असे आव्हानही ममता यांनी दिले.