सामान्य शेतकऱ्याने भर सभेत चंद्रकांत पाटलांना धरले धारेवर, भाजप उमेदवाराच्या सभेत गोंधळ

माढयाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे भाषणाला उभे राहिल्यानंतर उपस्थित मतदारांतील शेतकरी संपत काळे (रा. सूर्ली ता. माढा) हे उभे राहिले आणि त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

काळे यांचा आरोप होता, केंद्रातील तत्कालीन मंत्री श्रीपाद नाईक यांनी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा घेवून ‘शतावरी लागवड’ करा असे आवाहन केले. दस्तुरखुद्द मंत्री आवाहन करीत असल्याने माढा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ‘शतावरी लागवड’केली. झिरो अर्बल या कंपनीने शेतकऱ्यांची शतावरी खरेदी केली त्या पोटी शेतकऱ्यांना चेक दिले मात्र ते चेक अद्याप वटले नाहीत. माढा तालुक्यातील सुमारे 15 कोटी रुपयांची फसवणूक कंपनीने केली आहे. या बाबत माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंत्री नाईक, माढा लोकसभेचे खासदार निंबाळकर यांची भेट घेवून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र कोणीही दाद दिली नाही. निवडणूक आली की तुम्ही मत मागता आमच्यावर झालेला अन्याय कोण दूर करणार असा सवाल काळे यांनी भर सभेत विचारला. या प्रश्नाने गर्भगळीत झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या पक्षाकडून आला आहात असा प्रतिप्रश्न विचारुन गोंधळात अधिक भर टाकली.

पाटील यांच्या प्रश्नांने काळे अधिकच भडकले. मी कोणत्या पक्षाचा नाही मी सामान्य शेतकरी आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. माझी 22 लाखाची फसवणूक झाली आहे माझे पैसे द्या असे प्रतिउत्तर काळे यांनी पाटलांना दिले. या गोंधळात भाजप कार्यकर्ते काळे यांना धक्काबुक्की करण्यासाठी सरसावले. धक्काबुक्की करीत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जावू लागल्याने, सभेतील बहुतांश शेतकरी काळे यांच्या बाजूने उभे राहिले. शेतकरी अधिक आक्रमक होत असल्याचे पाहून चंद्रकांत पाटील, उमेदवार निंबाळकर, आमदार संजय शिंदे यांनी काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काळे शांत झाले नाही शेवटी नेत्यांनी सभेतून काढता पाय घेतला.