Snake Farming – सापाची शेती

>> स्पायडरमॅन

सापाचे नाव निघाले की, माणूस जरा दचकतोच. साप नावाचा प्राणी विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारांत आढळतो. मात्र काही विषारी सापांच्या चावण्याने माणसाचा मृत्यूदेखील ओढवू शकतो. त्यामुळे फारशी चिकित्सा न करता सापापासून दूर राहण्यातच माणूस भलाई मानतो. मात्र सगळेच काही अशा विचाराचे नसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपण जशी भाजीपाला, फळांची शेती करतो, अगदी तशी सापांची शेती करणारे एक संपूर्ण गाव आहे. चीनच्या झेजिंयांग प्रांतातील जिसिकियाओ गाव हे पूर्णपणे सापाच्या शेतीवर अवलंबून आहे. इथली प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने या सापशेतीशी जोडली गेलेली आहे. जिसिकियाओ गावात 3 दशलक्षाहून अधिक विषारी साप पाळण्यात आलेले आहेत. या गावाची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

अशा प्रकारच्या शेतीला ‘स्नेक फार्मिंग’ म्हणून ओळखले जाते. जिसिकियाओमधल्या अशा शेतीत किंग कोब्रा, अत्यंत विषारी असे व्हायपर आणि अजगरदेखील आढळतात. सापांची ही शेती मुख्यतः सापाच्या मांसासाठी आणि इतर अवयवांसाठी केली जाते. सापाच्या शरीरातील काही अवयवांचा वापर हा आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो आणि मुख्य म्हणजे चीनमध्ये आवडीने साप खाणारे अनेक खवय्येदेखील आहेत. त्यामुळे सापाच्या या शेतीला चांगलीच मागणी आहे. इतर साप – जसे की, अजगर – कातडीसाठीदेखील पाळले जातात. त्यांच्या कातडीपासून चामडय़ाच्या वस्तू बनवता येतात. अशा सापाच्या विशेष चामडय़ापासून बनवलेल्या पर्स, बेल्ट, बूट इत्यादींना प्रचंड मागणी असते आणि ते महागदेखील असतात.

इथे लाकूड आणि काचेच्या पेटय़ांमध्ये साप पाळले जातात. अंडय़ातून पिल्ले बाहेर आली की, त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीच्या मदतीने इतरत्र हलवण्यात येते. सापाची पूर्ण वाढ झाली की, त्याला मारण्यात येते. सर्वात आधी त्याचे विष काढले जाते आणि नंतर त्याचे डोके उडवण्यात येते. त्यानंतर त्याचे मांस काढून चामडी वाळवण्यासाठी ठेवण्यात येते. विशेष म्हणजे चीनमध्ये अशाच प्रकारे झुरळाचीदेखील शेती केली जाते.