सुंदर मी होणार – फॅशन मेकअप

>> शिवानी गोंडाळ

फॅशन मेकअप हा नेहमीच्या मेकअपपेक्षा वेगळा असतो. हा निष्णात अशा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट करूनच करून घ्यावा लागतो. या क्षेत्रात काम करणाऱया मेकअप आर्टिस्टला मेकअपचे तसेच कॅमेरा आणि लाइटिंग यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. तसेच त्याच्याकडे सूक्ष्म निरीक्षण, कलात्मक नजर, शिल्पकलेचे तंत्र, अंग आणि चित्रकाराचा हात असणे अत्यंत गरजेचे असते.

फॅशन मेकअप हा कॅटवॉक मॉडेल्स, काही कलेक्शन्स, बुक्स, कपडय़ांच्या जाहिराती, मासिकांचे शूट, कॅटलॉग शूट, व्हिडीओ प्रमोशन शूट, फोटोशूट, खास फॅशन फोटोशूट यांसाठी वापरला जातो. या मेकअपमध्ये मेकअप, हेअरस्टाइल, लाइटिंग, फोटोग्राफी या सगळय़ा गोष्टी एकमेकांशी निगडित असल्यामुळे या मेकअपचे वेगळेपण दिसून येते. फॅशन मेकअप हा मेकअप कलेतील मोठय़ा करीअरमधील एक भाग आहे. या मेकअप आर्टिस्टकडे येणाऱया प्रत्येक मॉडेलला एका विशिष्ट पद्धतीचा मेकअप करण्याचे तंत्र अवगत असणे महत्त्वाचे असते. तसेच ज्या ठिकाणी मेकअप करायचे आहे, त्या ठिकाणच्या डिझायनर बरोबर बोलून, विचारविनिमय करून काही लुक ठरवावे लागतात आणि त्याप्रमाणे मेकअप आर्टिस्टला आपले कौशल्या दाखवावे लागते. हा मेकअप खूप जलद करावा लागतो. कारण मॉडेलला एक ड्रेस बदलून पुन्हा दुसऱया ड्रेसवरील मेकअप करून पुन्हा स्टेजवर जायचे असते. अशा वेळेस वेळ कमी असल्यामुळे मॉडेलचे ड्रेस चेंज होत असतानाच मेकअपही करावा लागतो व हेअरस्टाइलही तेव्हाच बदलावी लागते.

फॅशन मेकअप करताना मेकअप आर्टिस्टला उत्तम मेकअप आणि वेगवेगळय़ा प्रकारचे तंत्र वापरण्याची हातोटी आवश्यक असते. मेकअप आणि फॅशन याचबरोबर त्याच्याकडे संवाद कौशल्य आवश्यक आहे. तसेच मेकअप करताना मेकअपमध्ये प्रत्येक डिटेलिंग करण्याची नजर मेकअप आर्टिस्टला असण्याची गरज असते.

अनेक वेळा चेहऱयावरील मेकअप हा एखाद्या प्रॉडक्टची ओळख असू शकतो, तर काही वेळा मेकअपमधील वेगवेगळे रंग वापरून चेहऱयावर एक विशिष्ट डिझाइन केले जाते आणि असे डिझाइन करताना ड्रेसचा रंग व डिझायनरला अपेक्षित असलेली थीम डोक्यात ठेवूनच वेगळय़ा प्रकारचा मेकअप केला जातो.

स्पर्धेत टिकायचे तर…
एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी मेकअप करताना संपूर्ण टीम एकत्र बसून, चर्चा करून कोणत्या प्रकारचा गेटअप केल्यास तो प्रॉडक्टसाठी सार्थ ठरेल याचा विचार करून त्यासाठी मॉडेलची निवड केली जाते, तर कॅटवॉक करताना काहीतरी नावीन्य दिसले पाहिजे याची दक्षता घ्यावी लागते. काही वेळा एखाद्या थीमवर मेकअप करावा लागतो. फॅशन इंडस्ट्री खूप मोठी असल्यामुळे इथे मोठी स्पर्धा असते. त्यामुळे येथे टिकून राहण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते, नाहीतर स्पर्धेत टिकून राहणे मुश्कील होते.

कलात्मकता हवी
प्रत्येक रंगाला स्वतःची अशी एक विशिष्ट ओळख असते. त्यामुळे फॅशन मेकअप करताना या रंगांचा स्वभाव लक्षात घेऊनच चेहऱ्यावर किंवा बॉडीवर हे रंग वापरावे लागतात. अनेक वेळा मोर, वाघ, सिंह, अजगर अशी प्राण्यांची चित्रे चेहऱयावर रेखाटली जातात, तर काही वेळा पाने, फुले यांचीही चित्रे चेहऱ्यावर रेखाटली जातात. संपूर्ण चेहरा एका रंगाने रंगवतानाच त्यामध्ये काही शेड्स तयार केल्या जातात. फॅशन मेकअपचे वेगळेपण दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्टकडे कलात्मक नजर असणे अत्यंत गरजेचे असते. तरच तो प्रत्येक चेहरा आपल्या सिद्धहस्ताने प्रत्येक वेळेस वेगवेगळा दाखवू शकतो आणि या फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःच एक वेगळे स्थान निर्माण करू शकतो.

(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]