महाराष्ट्रातून गुजरातला पळवलेल्या प्रकल्पाला नाट; फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला, मोदींना झटका

महाराष्ट्रात येणारा तब्बल 19.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेला सेमीकंडक्टर प्रकल्प गेल्या वर्षी गुजरातला पळवून नेला. मात्र, आता या प्रकल्पातून तैवानची कंपनी फॉक्सकॉन बाहेर पडली आहे. वेदांताबरोबरचा करार मोडल्याचे फॉक्सकॉनने आज जाहीर केले. उद्योग विश्वातील या घडामोडींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झटका बसला आहे.

     तैवानची फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रक्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकर कंपनी आहे. गेल्यावर्षी हिंदुस्थानची वेदांता लिमिटेड आणि फॉक्सकॉनमध्ये करार झाला. गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रॉडक्शन निर्मिती कंपनी उभारण्याची घोषणा करण्यात आली. तब्बल 19.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक यासाठी करण्यात येणार होती. हा प्रकल्प गुजरातमध्ये व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिले. सेमीकंडक्टर चीपचा वापर मोबाईलपासून कार, रेफ्रिजरेटरपर्यंत होतो. त्यामुळे गुजरातमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचे हब उभारण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत. मात्र, आज त्यांना जोरदार झटका बसला.

वेदांतासोबतचा करार तोडल्याची घोषणा फॉक्सकॉनने केली. वेदांताबरोबरच्या ज्वाईंट व्हेंचरमधून आम्ही बाहेर पडत असून, यापुढे आमची भागीदारी नाही. त्यामुळे आता फॉक्सकॉन हे नावही या प्रकल्पातून वगळावे, असे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे.

राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका अधिवेशनात ठेवणार

राज्यात येणारे अनेक मोठे प्रकल्प मिंधे सरकारच्या निष्क्रियेमुळे शेवटच्या क्षणाला राज्याबाहेर गेले. त्यामुळे लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार महाराष्ट्राने गमावले. याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत ती काढली गेली नाही. आज वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प देशाबाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांना माध्यमांनी त्यासंदर्भात विचारले. त्यावर येत्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले. वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस टाटा, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पां संदर्भात ही श्वेतपत्रिका असेल, असे त्यांनी सांगितले.

तळेगाव येथे होणार होता प्रकल्प

वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प पुणे जिह्यात तळेगाव येथे होणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. 19.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. एक लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळणार होता. मात्र, गेल्या वर्षी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. मिंधे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातून प्रकल्प पळवून गुजरातला नेला. मात्र, आता ‘फॉक्सकॉन’च बाहेर पडल्यामुळे प्रकल्प अडचणीत आला आहे.