12 वर्षांपूर्वी तोडण्यात आलेल्या झोपड्या पात्र ठरल्यास मिळणार घर

>> अमर मोहिते

भांडुप येथील तानसा पाइपलाइनजवळील झोपड्या 2011मध्ये तोडण्यात आल्या होत्या. यातील अपात्र ठरलेल्या 68 झोपडय़ांच्या पात्रतेची फेरतपासणी करा. ज्या झोपड्या पात्र ठरतील त्यांचे पुनर्वसन करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला दिले. मतदान ओळखपत्र, वीज बिल व सर्व्हे पावती सादर करूनही या झोपडीधारकांची पात्रता निश्चित केली जात नव्हती. न्यायालयाने आदेश दिल्याने या कागदपत्रांच्या आधारे पालिकेला त्यांची पात्रता निश्चित करावी लागणार आहे.

पालिकेच्या ‘एस’ प्रभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तानसा पाइपलाइनजवळील दहा मीटर परिसरात असणाऱया झोपडय़ा पालिकेने 2011मध्ये पालिकेने तोडल्या. येथे एकूण 1534 झोपडय़ा होत्या. त्यातील 729 झोपड्या पुनर्वसनासाठी पात्र ठरल्या तर 805 झोपडय़ा अपात्र ठरल्या. अपात्र ठरलेल्या 805 झोपडय़ांपैकी 68 झोपड्यांच्या पात्रतेची फेरतपासणी करावी, अशी विनंती अखिल पाइपलाइन समितीने केली होती. मात्र ही फेरतपासणी काही झाली नाही. त्यामुळे यातील काही झोपडीधारकांनी उच्च न्यायलायात धाव घेतली.

जीवक शंकर कदम व अन्य यांनी अॅड. इम्तियाज पटेल यांच्यामार्फत याचिका केली. आम्ही सर्व कागदपत्रे सादर करूनही आम्हाला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर आमच्या झोपड्या तोडण्यात आल्या. मात्र 1995 किंवा 2000पर्यंतच्या झोपडय़ा पुनर्वसनासाठी पात्र आहेत, असा अध्यादेश 2012मध्ये पालिकने काढला. या अध्यादेशानुसार आमच्या पात्रतेची तपासणी पुन्हा करावी, अशी विनंती पालिकेला करण्यात आली. पण पालिकेने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. न्यायालयानेच पालिकेला पात्रतेची फेरतपासणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली.

न्या. सुनील शुव्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. 2012 व 2014मध्ये राज्य शासनाने अध्यादेश काढून 2000पर्यंतच्या झोपडय़ा पुनर्वसनासाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या झोपडय़ा पाडण्यात आल्या असल्या तरी आमच्या पात्रतेची फेरतपासणी व्हावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. या विनंतीला पालिकेने विरोध केला. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करत वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली.

महापालिकेला भीती उर्वरित 737 झोपडीधारकांची

पुनर्वसनासाठी अपात्र ठरलेल्या 68 जणांच्या पात्रतेची फेरतपासणी करण्यासाठी एस प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी उपायुक्तांना 2015मध्ये पत्र लिहिले होते. 68 जणांच्या पात्रतेची फेरतपासणी करण्यासाठी या पत्रात परवानगी मागण्यात आली होती. तसेच 68 जणांच्या पात्रतेची फेरतपासणी झाल्यास उर्वरित 737 अपात्र झोपडीधारक फेरतपासणीची मागणी करतील, अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली होती. हे पत्र याचिकेला जोडण्यात आले आहे.

दिमाखात उभा शिवडीन्हावा शेवा

शिवडी-न्हावा शेवा सागरी उड्डाणपुलाचे समुद्रातील काम जवळजवळ पूर्ण झाले असून यावर आता विजेच्या दिव्यांसाठी लागणाऱया खांबांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. नागमोडी वळणाचा हा पूल दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन जाण्यासाठी तयार होत असून मुंबईच्या दिमाखदार सौंदर्यात आणखी भर घालणार आहे.