गोलमाल! भाजप नेत्याच्या मेहुणाच्या गाडीतूनच अवैध दारू जप्त; चौकशी सुरू, पक्षाची झाली पंचाईत

kothari-police-station-chandrapur

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज शांत होत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात जागोजागी पोलीस पथकं तैनात असून गाड्यांची तपासणी सुरू आहे. या दरम्यान पोलिसांना एक मोठं यश हाती आलं असून एका वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी गाडीत असलेला आशीष मोरे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान एक मोठी माहिती हाती लागली असून ही व्यक्ती चंद्रपूर जिल्हा भाजपचे मोठे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा मेहुणा (साळा) असल्याचे बोलले जात आहे.

मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना झालेली ही कारवाई भाजपला मोठा धक्का देणारी ठरली.

जिल्ह्यातील कोठारी येथे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन पकडले. महिंद्रा बोलेरो कंपनीच्या या वाहनात सुमारे सात हजार रुपयांचा दारूसाठा लपवून ठेवण्यात आला होता. या वाहनात भाजप नेते देवराव भोंगळे यांचा मेहुणा आशीष मोरे बसला होता. हे वाहन पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता त्यात सात हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली.

कोठारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू नेमकी कुठे आणि कुणासाठी पोहोचवली जात होती, याचा तपास सुरू असून, निवडणुकीच्या दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानं भाजपची नाचक्की होत आहे. आरोपी आशीष मोरे हा चंद्रपूर जिल्ह्यातील तोहोगाव येथील रहिवासी असून, त्याची आता कोठारी पोलीस स्थानकात कसून चौकशी केली जात आहे.

दारूबंदीसाठी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जीवाचे रान करून ती इथे लागू केली. मात्र त्यांच्याच पक्षातील नेते दारूला समर्थन देनाता या घटनेतून दिसून आले. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दारूवरून काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली होती, हे विशेष. मात्र आता भाजपच्याच मोठ्या नेत्याचा शालकच दारूची वाहतूक करताना आढळल्याने भाजपला नाचक्की सहन करावी लागत आहे.