बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त, एटीएसची डोंगरीत धडक कारवाई 

डोंगरी परिसरात बेकायदेशीर सिमबॉक्सच्या सहाय्याने अनधिकृतपणे सुरू असलेले टेलिफोन एक्स्चेंज दहशतवादविरोधी कक्षाच्या नागपाडा युनिटने उद्ध्वस्त केले. पोलिसांनी छापा टाकला त्या ठिकाणी चार सिमबॉक्समध्ये एकूण 149 एअरटेल कंपनीची सिमकार्ड भरलेली मिळून आली. या कारवाईत 5 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे बेकायदेशीर टेलिकॉम एक्स्चेंज चालविणाऱया रियास मोहम्मद (24) याला बेडय़ा ठोकण्यात आल्या.  

डोंगरी परिसरात बेकायदेशीर सिमबॉक्सच्या आधारे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवले जात असल्याची माहिती नागपाडा युनिटला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर डॉटचे अधिकारी व सरकारी पंचासमवेत डोंगरीत एका घरावर छापा टाकला. त्यावेळी रियास मोहम्मद (24) हा तरुण साडला. तो मूळचा केरळचा असून बांगलादेशात राहणाऱया अलामल याच्या साथीने झटपट पैसा कमावण्यासाठी हे कृत्य करत होता. दरम्यान, पोलिसांनी त्या घराची झडती घेतली असता त्या घराच्या पोटमाळय़ावर एक खाच करून त्यात एकूण चार सिमबॉक्स सिमकार्ड भरलेल्या स्थितीत मिळून आले. या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून दहशतवाद्यांना मदत मिळण्याची दाट शक्यता होती, पण वेळीच नागपाडा युनिटने ते एक्स्चेंज उद्ध्वस्त करून गैरकृत्य करणाऱयांना दणका दिला.  

बांगलादेशातील भिडूच्या मदतीने 

रियास मोहम्मद याने बांगलादेश येथे राहणाऱया अलामल या साथीदाराच्या मदतीने पैसे कमावण्यासाठी चायना सिमबॉक्स वापर करून बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू केले होते. हे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी त्यांनी डोंगरीत एक घर भाडय़ाने घेऊन तेथे टेलिफोन एक्स्चेंज थाटले होते. रियास याने त्याच्या डोंगरी येथील ठिकाणी परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्याच्याकडील उपकरणाद्वारे हिंदुस्थानातील इच्छुक मोबाईल नंबरवर अनधिकृतरीत्या राऊट करून केंद्र सरकारच्या टेलिकॉम खात्याची आर्थिक फसवणूक केली आहे.