पहिला दिवस यशस्वीने तर दुसरा दिवस बुमराहने गाजवला, इंग्लंड 253 वर ऑलआउट

हिंदुस्थान आणि इंग्लंड या संघांमध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम (वायजैग) च्या डॉ.वाई.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ (3 फेब्रुवारी) संपला असून बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लडचा अर्ध्या संघांने नांग्या टाकल्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंड ऑल आऊट झाली असून हिंदुस्थानच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली.

पहिला दिवस यशस्वी जयसवालने यशस्वी केला. दुसऱ्या दिवशी 179 पासून सुरुवात करणाऱ्या यशस्वीने आपल्या कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. यशस्वीच्या द्विशतकामुळे (209) टीम इंडियाने पहिल्या डावात 396 धावा केल्या. कसोटीमध्ये द्विशतक ठोकणारा तो तिसरा सर्वात तरुण हिंदुस्थानी खेळाडू ठरला. प्रत्युत्तरात इंग्लडचा संघ उतरला मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांना 253 या धावसंख्येवर थांबायला भाग पाडले.

इंग्लडने त्यांच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली केली होती. जॅक क्रोली तुफानी फटकेबाजी करत असल्यामुळे 113 या धावसंख्येवर इंग्लडचा केवळ एक गडी बाद झाला होता. त्यामुळे इंग्लड पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण जसप्रीत बुमराहाचा इरादा डोंगर फोडाण्याचा होता. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लडच्या फलंदाजांची भांबेरी उडली. बुमराहला साथ दिली ती कुलदीप यादवने. या दोघांनी मिळून इंग्लडचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यामुळे इंग्लडला पहिल्या डावात फक्त 253 घावा करत्या आल्या, जॅक क्रॉलीने 78 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहने 6 आणि कुलदीप यादवने 3 गडी बाद केले. हिंदुस्थानच्या दुसऱ्या डावाची सुरूवात झाली असून कर्णधार रोहित शर्मा 13 तर यशस्वी जयसवाल 15 धावांवर नाबाद असून टीम इंडियाकडे आता 171 धावांची आघाडी आहे.