IND vs ENG – सिराजचा विकेटचा ‘चौकार’, इंग्लंड 319 धावांत गारद; हिंदुस्थानकडे 126 धावांची आघाडी

राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीवर हिंदुस्थानने आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत हिंदुस्थानने इंग्लंडचा डाव 319 धावांमध्ये गुंडाळत 126 धावांची मोठी आघाडी घेतली. पहिल्या सत्रामध्ये तीन विकेट गमावलेल्या इंग्लंडच्या फलंदाजीला दुसऱ्या सत्रामध्ये भगदाड पडले आणि पाहुण्या संघाने तासाभरात 5 विकेट गमावल्या.

इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेट याने दीडशतक ठोकले. बाद होण्यापूर्वी त्याने 153 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कर्णधार बेन स्टोक्सने 41 धावांचे योगदान दिले. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने विकेटचा चौकार ठोकला. 84 धावा देत त्याने 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी दोन, तर आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

खेळाडूंच्या दंडावर काळी पट्टी

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (निरंजन शहा मैदान) सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हिंदुस्थानचे सर्व खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)