हिंदुस्थानी तरुण उद्योजक देशाबाहेर जात आहेत! रोजगार निर्मितीवरून रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

अनेक तरुण हिंदुस्थानी उद्योजक त्यांच्या उद्योगांसाठी परदेशात जात आहेत,कारण ते इथे खुश नाहीत, अशी चिंता भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. तरुणांमध्ये विराट कोहली मानसिकता वाढत असून त्यांना जिथे अंतिम ध्येय सहज साध्य होईल, अशा ठिकाणी जाणं ते पसंत करत असल्याचंही राजन यांनी म्हटलं आहे.

अनेक हिंदुस्थानी उद्योजक आणि व्यापारी जे या क्षेत्रात संशोधन करू इच्छितात ते सगळेच हल्ली सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीला जात असल्याच्या प्रश्नावर राजन म्हणाले की, त्यांना वास्तविक आपल्या व्यवसायाचा वैश्विक स्तरावर विस्तार करायचा आहे. त्यामुळे ते जगाहून आपण कुठेही कमी नाही, हे दाखवत आहेत. आपल्याकडे क्रयशक्ती असूनही आपण त्याचा योग्य वापर करत नाही. त्यामुळे क्रयशक्तीचा योग्य वापर करण्याकडे आपला कल असला पाहिजे.

जर तरुण उद्योजक आणि स्टार्टअप सुरू करणारी युवा पिढी जर देशाबाहेर जात असेल तर असं काय आहे जे त्यांना देशाच्या बाहेर पडण्यासाठी भाग पाडतं? याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यातील अनेक जण हिंदुस्थआनात खुश नाहीत, हे वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे, असं राजन म्हणाले. तसंच, देशात गेल्या अनेक वर्षांपासून रोजगार निर्मिती घटताना दिसत आहे. त्यावरही विचारपूर्वक कृती होणं गरजेचं आहे.