सुस्साट राजस्थानच्या रडारवर आज गुजरात टायटन्स

आतापर्यंत अजेय असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाच्या चौकारासह आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामात अव्वल स्थानावर आहे. सुस्साट सुटलेल्या या संघाच्या रडारवर बुधवारी (दि. 10) गुजरात टायटन्सचा संघ असेल. गत उपविजेत्या गुजरात संघाला यंदाच्या स्पर्धेत अद्याप छाप सोडता आलेली नाहीये. त्यातच उद्या त्यांच्यासमोर राजस्थानसारखा मातब्बर संघ असल्याने पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी या संघाला सर्वच स्तरावर सरस कामगिरी करावी लागणार आहे.

फलंदाजी राजस्थानची ताकद

जबरदस्त फलंदाजी ही राजस्थान रॉयल्सची मुख्य ताकद होय. त्यांचा फक्त यशस्वी जैस्वाल फॉर्मात नसून बाकी सर्व अलबेल आहे. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जोस बटलरने जबरदस्त शतक ठोकून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. कर्णधार संजू सॅमसनही फॉर्मात असून, त्याने चारपैकी दोन सामन्यांत अर्धशतके ठोकली आहेत. रियान परागही मधल्या फळीत आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहे. त्याने दोन नाबाद अर्धशतके झळकवली आहेत.

गुजरातला दम दाखवावा लागेल

गुजरातकडे प्रतिभावान फलंदाजांची कमतरता नाहीये, पण आतापर्यंत कोणालाही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. कर्णधार शुबमन गिलने पंजाब किंग्सविरूद्ध नाबाद 89 धावांची खेळी केली होती, मात्र त्यानंतर त्याचीही बॅट गप्पच आहे. डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा व विजय शंकर धावा करण्यात अपयशी ठरत आहे. मागील सामन्यात सबस्टीटय़ुड फलंदाज म्हणून आलेल्या केन विल्यम्सनला आता आपला अनुभव पणाला लावण्याची वेळ आली आहे. कारण लखनौला 163 धावांवर रोखल्यानंतरही गुजरातचा 33 धावांनी पराभव झाला. त्यामुळे फलंदाजीतील चुका टाळून त्यांना मैदानावर उतरावे लागणार आहे.

गोलंदाजीतही राजस्थानच सरस

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही राजस्थानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. ट्रेंट बोल्ट व नांद्रे बर्गर हे पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये टिच्चून मारा करत असून, बळीही टिपत आहेत. लेग स्पिनर युझवेंद्र चहलली प्रतिस्पर्धी संघांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत आहे. दुसरीकडे मोहित शर्मा सोडल्यास इतर गोलंदाज फ्लॉप ठरत असल्याने गुजरातने पाचपैकी तीन लढती गमावल्या आहेत. उमेश यादव व राशीद खान या अनुभवी जोडगोळीला अद्याप आपल्या लौकिकास जागता आलेले नाहीये. त्यामुळे राजस्थानचा विजयरथ रोखायचा असेल तर गुजरातला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावर सरस कामगिरी करावी लागणार आहे.