सध्याच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज – उद्धव ठाकरे

शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. जालिंदर सरोदे यांनी आपल्या समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरोदे व त्यांच्यासोबतच्या शिक्षकांनी फक्त शिक्षक सेनेपुरता मर्यादीत न राहता शिवसेनेसोबत काम करायचा निर्धार केला आहे.  शिक्षक म्हटल्यानंतर विद्यार्थी ऐकणार नाही, असे होतच नाही. वेळप्रसंगी तुम्हाला हातात छडी देखील घ्यावी लागेल. सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यात अनेकांना सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज आहे. सध्या जे सुरू आहे, ती आपली संस्कृती नाही. तुम्ही शाळेत मेहनत करतात, त्यातून तुम्ही भावी पिढी तयार करता. ही भावी पिढी नासक्या कुसक्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपल्या शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग तरी काय? तुम्ही अत्यंत वेळेवर शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्या फोडोफोडीचे राजकारण सुरू आहे. मला या सर्व कामांमध्ये माझ्यासोबत जे येतायत त्यांचा विशेष अभिमान आहे. आज माझ्याकडे काही नाही. प्रत्येकवेळी काहीतरी हवे म्हणून विरोधी पक्षातून काहीजण सत्ताधारी पक्षात जातात. आज तुम्ही सत्ता आणण्यासाठी माझ्याकडे आलेले आहात. शिक्षक म्हटल्यावर त्यांना एखादी गोष्ट समजून सांगण्याची कला असते. त्या कलेमुळे आपले राज्य सुजाण करणे आणि जे काही धडे आपण लहानपणी गिरवले ते धडे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी तुमच्या सर्वांचा मला उपयोग करुन घ्यायचा आहे. प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे विषय असतात, पण शिक्षकांचा विषय कोणीच तिकडे मांडलेला नाही. पण तो नीट मांडणारा स्वत:चा हक्काचा आवाज तिथे पाहिजे.

 शिक्षकांनी शिक्षकांचेच काम करावे. त्याला कोणत्याही दुसऱ्या ड्युटीवर लावता येणार नाही. नाहीतर आपण शिकवणार तरी कसे ? आता जो काही लढा सुरु आहे. आता तर तुमच्यासाठी लढण्याची माझी जबाबदारी आहे. आता तर मी लढेन पण जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो न्याय मिळविण्यासाठी आपल्य़ाला हा विजय आवश्यक आहे. तो नुसता महापालिकेत नाही, नुसता विधानसभेत नाही तर देशातल्या लोकसभेत जी घोषणा अब की बार भाजप तडीपार यांना तडीपार केल्याशिवाय आपल्याला काय न्याय मिळणार नाही. तडीपारीची नोटीस मी त्यांना दिलेली आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्हाला करायचे आहे. मला खात्री आहे की यांचे सर्व उद्योग पाहिल्यानंतर तुम्ही त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनातले सुराज्य म्हणाल ते आणल्याशिवाय राहणार नाही आणि ते आणण्यामागे शिक्षकांचा वाटा फार मोलाचा असेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.