जालना महापालिकेच्या वसुली लिपिकास 30 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

जालना महानगरपालिकेचा वसुली लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराकडून 30 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. जालन्यातील गांधीचमन जवळील ग्लोबस मेडिकलसमोर बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. उत्तम शंकरराव लाडाने (रा. इन्कमटॅक्स कॉलनी, म्हाडा कॉलनी, जालना) असे लाच घेणार्‍या वसुली लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदाराला जालना महानगरपालिकेकडून 2018 ते 2024 या काळात मालमत्ता कर म्हणून 1 लाख 24 हजार 596 रुपये भरण्याची नोटीस मिळाली होती. त्यानुसार 5 एप्रिल रोजी यापैकी 41 हजार 532 रुपये चेकद्वारे भरण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम भरू नका आणि कर निल करून देण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी लाडाने यांनी केली. यापैकी 10 हजार रुपये तक्रारदाराने तात्काळ दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्यास सांगितले.

मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि पंचांसमक्ष 30 हजारांची लाच घेताना लाडाने यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जालना पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे, पथकातील अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, संदीपान लहाने, विठ्ठल कापसे यांनी केली आहे.