कॅप्टन बुमराह आला रे… आयर्लंड दौऱयासाठी सोपवले टीम इंडियाचे नेतृत्व

दुखापतीमुळे तब्बल वर्षभर संघाबाहेर असलेला फलंदाजांचा कर्दनकाळ जसप्रीत बुमराहचे आता धडाकेबाज पुनरागमन होणार आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी आयर्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानच्या टी-20 संघाची घोषणा केली. या संघाचे कर्णधारपद चक्क बुमराहकडे सोपविण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे.

वरिष्ठांना विश्रांती; नव्या चेहऱयांना संधी

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आयर्लंड दौऱयावर अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. या मालिकेत हिंदुस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात पुनरागमन होणार आहे. मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याच्याकडे संघाचे उपकर्णधार पद सोपविण्यात आले आहे. निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतलाय. हिंदुस्थानी संघ 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळणार आहे. हे तिन्ही सामने डब्लिनमध्ये होणार आहेत.

आयर्लंड दौऱयासाठी निवडलेला हिंदुस्थानी संघ ः जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.