Weather Alert: हाय गर्मी! तापमान आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, जाणून घ्या IMDचा नवा इशारा

उत्तर हिंदुस्थानात उष्णतेची लाट कधी थांबणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. उत्तर हिंदुस्थानातील आठ राज्यांमध्ये पारा 43 अंशांच्या वरच असल्याची स्थिती आहे. राजस्थानच्या अनेक भागात तापमान 48 अंशांच्या पुढे गेले आहे. गुजरातमध्येही तापमान 45 च्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती दिलासा देणाऱ्या पावसाची. पण उत्तर हिंदुस्थानमध्ये पावसाचे ढग पोहोचण्यासाठी आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळात वाऱ्यांमुळे दिल्लीत वाढत्या तापमानाचा पारा आटोक्यात आला असला तरी पुढील काही दिवसांत कमालीचा उष्मा वाढण्याची शक्यता आहे.

तापमानात आणखी 3 ते 4 अंशांनी वाढ होईल

बुधवारीही हिंदुस्थानच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता कायम राहिली आणि बाडमेरमध्ये या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. कडाक्याच्या उन्हात दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळीही घसरली असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम हिंदुस्थानात तीन ते चार अंशांनी तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गरम रात्री समस्या वाढवतील

हवामान खात्याने राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, सर्व वयोगटातील लोकांमध्ये उष्मा-संबंधित आजार आणि उष्माघाताची ‘अधिक संभाव्यता’ चेतावणी दिली आहे. IMD च्या माहिती नुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील चार दिवसांत रात्रीच्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेशी संबंधित ताण आणखी वाढू शकतो.

रात्रीचे उच्च तापमान धोकादायक मानले जाते कारण शरीराला थंड होण्याची संधी मिळत नाही. शहरांमध्ये रात्री उष्णतेचे प्रमाण वाढणे सामान्य आहे. यामध्ये मेट्रो शहर आजूबाजूच्या भागापेक्षा जास्त गरम आहे. अति उष्णतेमुळे वीज पुरवठ्यावर ताण पडत आहे आणि पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत आहेत, ज्यामुळे देशाच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जलाशय कोरडे ठाक

केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, देशातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई वाढली आणि जलविद्युत निर्मितीवर लक्षणीय परिणाम झाला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मजूर, वृद्ध लोक आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

उष्णतेच्या लाटेमुळे हजारो मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 1998 ते 2017 दरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे 1,66,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी जुलैमध्ये संसदेत सांगितले होते की 2015 ते 2022 दरम्यान हिंदुस्थानात उष्णतेच्या लाटेमुळे 3,812 मृत्यू झाले होते, एकट्या आंध्र प्रदेशात 2,419 मृत्यू झाले होते.

24 ठिकाणी तापमानाने 45 अंश पार केले

बुधवारी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील किमान 24 ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले. राजस्थानमध्ये बाडमेरमध्ये 48 अंश सेल्सिअस, चुरूमध्ये 47.4 अंश, फलोदीमध्ये 47.8 अंश आणि जैसलमेरमध्ये 47.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य प्रदेशातील रतलाम येथे 45 अंश, महाराष्ट्रातील अकोला येथे 44.8 अंश, हरियाणातील सिरसा येथे 47.7 अंश, पंजाबमधील भटिंडा येथे 46.6 अंश, गुजरातमधील कांडला येथे 46.1 अंश आणि उत्तर प्रदेशातील झाशी येथे 45 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.