मोदींची चायनिज गॅरंटी; लडाखचा विश्वासघात केल्याचा मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

‘मेड इन चायना’ म्हटलं की तकलादू आणि विश्वासार्ह नसलेली वस्तू, अशी बाजारात ओळख आहे. हा धागा पकडत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींनी लडाखच्या लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे. लडाखमधील नागरिकांनी राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. पण इतर गॅरंटी प्रमाणेच घटनात्मक हक्कांची खात्री देण्याची मोदींची ही ‘चायनिज गॅरंटी’ आहे. चिनी सैन्याने अजूनही हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा केलेला आहे, असा टोला खरगे यांनी लगावला.

लडाखच्या केंद्र शासित प्रदेशाला सहाव्या अनुसूची अंतर्गत राज्याचा दर्जा आणि घटनात्मक संरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने होत आहेत. राज्यघटनेची सहावी अनुसूची ज्या अंतर्गत आदिवासी संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी केली जात आहे. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर ते दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभागले गेले, त्यापैकी एक जम्मू आणि काश्मीर आणि दुसरा लडाख होता. मात्र, आता लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी जनतेने केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका इंग्रजी वर्तमानपत्राची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘लडाखमध्ये संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत जन-जातीय समुदायाच्या सुरक्षेबाबत मागणी वाढली आहे. त्यासाठी लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. पण इतर सर्व गॅरंटी प्रमाणेच लडाखच्या जनतेला घटनात्मक हक्क मिळवून देण्याची मोदींची गॅरंटी हा मोठा विश्वासघात आहे. ही गॅरंटी चायनिज आहे.’

मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की, ‘मोदी सरकारला लडाखच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या हिमालयीन नद्यांचा आपल्या जवळच्या मित्रांना फायदा मिळवून द्यायचा आहे. गलवान व्हॅलीमध्ये आमच्या 20 शूर जवानांच्या बलिदानानंतर पंतप्रधान मोदींनी चीनला क्लिन चीट दिली. यामुळे चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहन मिळाले आहे.’

एकीकडे मोदी सरकारने आमची प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे, तर दुसरीकडे लडाखमधील आमच्याच नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर ते आक्रमण करत आहे. 2014 पासून पंतप्रधान हिंदुस्थान आणि चीन यांच्यात समोरासमोर चर्चेच्या किमान 19 फेऱ्या झाल्या आहेत. असे असूनही मोदी सरकार 2020 पूर्वी यथास्थिती कायम ठेवत आहे. चीनने डेपसांग मैदाने, हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा भागातील हिंदुस्थानी प्रदेशांवर कब्जा करणे सुरूच ठेवले आहे. काँग्रेस लडाखचे संरक्षण करण्यासाठी आणि आमच्या सीमेवर आमच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.