कुर्ला, घाटकोपर, भांडुपमध्ये हजारो झोपड्यांवर दरडीचा ’काळ’, एक लाख रहिवाशांना धोका

>> देवेंद्र भगत

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असल्याने पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत असताना मुंबईच्या पूर्व उपनगरातील ‘एल’ वॉर्ड कुर्ला, ‘एन’ वॉर्ड घाटकोपर आणि ‘एस’ वॉर्ड भांडुपमध्ये तब्बल दहा हजारांवर झोपडय़ांवर दरडी कोसळण्याची भीती असून एक लाखांवर रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यामध्ये कुर्ल्यात नऊ ठिकाणी, घाटकोपरमध्ये 17 ठिकाणी तर भांडुपमध्ये तब्बल 42 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. अतिवृष्टीत या ठिकाणी दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असल्यामुळे संबंधित झोपडपट्टीवासीयांना पालिका घरे रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी नोटीस बजावणार आहे.

मुंबईत पूर्व उपनगरात दरडी आणि डोंगराळ भाग सर्वाधिक आहे. शुक्रवारी घाटकोपरमध्ये दरड कोसळल्यामुळे बारा झोपडय़ा हटवाव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळण्याची संभाव्य ठिकाणे असलेल्या विभागातून माहिती एकत्र करून 2017 मध्ये पालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण 299 ठिकाणांचे शास्त्राrय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यात आली होती. 2018 मध्ये भारतीय सर्वेक्षण विभागाने 299 पैकी 249 संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणांचे सखोल सर्वेक्षण करून त्याचे चार उपप्रकारांत विभाजन केले. यामध्ये 46 ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे जाहीरही करण्यात आले होते. यानुसार पालिका जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पावसाळय़ापूर्वी या अतिधोकादायक ठिकाणांवरील झोपडीधारकांना नोटीस बजावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे निर्देश दिले जातात.

जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिकेची तयारी

– भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभाग आणि तांत्रिक समितीच्या मतानुसार मुंबईत 24 तासांत 200 किंवा 250 मिमी पाऊस झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने दरडी कोसळणाऱया संभाव्य ठिकाणांच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

– शिवाय आपत्कालीन विभागाकडून आपत्कालीन स्थितीत काय करावे, काय करू नये, प्रथमोपचार, जखमींना वाहून नेण्याची पद्धती याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

– अशी घटना घडल्यास पालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याकरिता अंधेरी क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकडय़ा व पूर्व उपनगरासाठी विक्रोळी व कांजूरमार्ग या ठिकाणी दोन जादा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

अशा केल्या सुरक्षेच्या उपाययोजना

– दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱया संभाव्य ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासोबत सांडपाणी सुविधा, वेळोवेळी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, नवीन झाडांची डागडुजी, नवीन झाडांची लागवड, नागरिकांचे मान्सून कालावधीत तात्पुरते स्थलांतर, धोकादायक ठिकाणी फलक लावणे, जनजागृती करणे, वैयक्तिकरीत्या नोटीस बजावणे, स्थानिक नागरिकांकरिता जनजागृती व प्रशिक्षण अशा उपाययोजना भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभाग आणि भूस्खलन तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार करण्यात येतात.

‘एस’ वॉर्ड भांडुपमध्ये पश्चिमेचा भाग डोंगराळ आहे. संपूर्ण परिसरात 42 ठिकाणे धोकादायक असून 13 ठिकाणी अतिधोकादायक आहेत. पावसाळय़ात हा धोका टाळण्यासाठी आवश्यक सूचना, जनजागृती, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणासाठी नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जाते. – भास्कर कासगीकर, सहाय्यक आयुक्त, ‘एस’ वॉर्ड