मुंबईत पावसाळी आजाराचा पहिला बळी, लेप्टो रुग्णाचा नायर रुग्णालयात मृत्यू

मुंबईत या वर्षी पावसाने उशिरा एंट्री केली असली तरी पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांनी उसळी घेतली असून मुंबईत पावसाळी आजाराने पहिला बळी घेतला आहे. नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ठाण्यातील लेप्टो रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या महिनाभरात डेंग्यूचे 353, मलेरियाचे 676 तर गॅस्ट्रोचे तब्बल 1744 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाईड, कॉलरा, जाँडीस असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येते. तरीदेखील सततच्या पावसामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे समोर येत आहे.

नायरमध्ये उपचार घेत असलेला 38 वर्षांचा पुरुषाचा 23 जूनला मृत्यू झाला. हा रुग्ण ठाण्यात राहणारा होता. त्याला इतर शारीरिक आजारही होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी दिली.

स्वाईन फ्लूचीही रुग्णवाढ
मुंबईत गेल्या महिनाभरात स्वाईन फ्लूचे (एच1एन1) 90 तर चिकुनगुनियाचे 8 रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूची लागण झाल्यास ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलटय़ा, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळतात.

पालिकेकडून सर्वेक्षणासाठी चार लाखांवर घरांना भेटी
साथीच्या आजारांच्या रुग्णांना शोधून उपाययोजना करण्यासाठी पालिकेकडून 24 जूनपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीमकडून आतापर्यंत तब्बल 4 लाख 18 हजार 66 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत.

या सर्वेक्षणात 15 लाख 95 हजार 560 लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यात आले. यामध्ये तापाचे 2 हजार 73 रुग्ण आढळले आहेत. तर या सर्वेक्षणादरम्यान 4004 जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.