1019 ग्रामपंचायतींचा कारभार 660 ग्रामसेवकांवर

प्रत्येक गावातील लोकांच्या दैनंदिन समस्या सुटाव्यात, गावच्या विकासाची कामे वेळेत व्हावीत म्हणून ‘ग्रामपंचायत तेथे ग्रामसेवक’ आवश्यकच आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 19 ग्रामपंचायतींचा कारभार सध्या केवळ 660 ग्रामसेवकांवर सुरू असल्याची विदारक स्थिती समोर आली आहे. शासनाकडून भरती न झाल्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.

सोलापूर जिह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा या तालुक्यांमध्येच ग्रामसेवकांची सर्वाधिक 72 पदे रिक्त आहेत. त्यानुसार अक्कलकोट 19, बार्शी 26, करमाळा 17, कुर्डुकाडी 10, सांगोला आठ, उत्तर सोलापूर दोन, पंढरपूर तीन, दक्षिण सोलापूर एक, अशी ग्रामसेवकांची एकूण 86 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती मागील सहा-सात वर्षांत झालेली नाही, त्यामुळे ‘एक ग्रामसेवक अन् त्यांच्याकडे दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार’ अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेने त्यांच्याकडील सर्वच विभागांमधील रिक्त पदांची माहिती शासनाला दिली आहे. त्यामुळे नेमक्या काय अडचणी येत आहेत, त्यासंबंधीदेखील स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. मात्र, भरतीप्रक्रिया झाली नाही, हे विशेष. गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवताना ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. शासनाकडून तलाठी भरती जाहीर झाली, आता ग्रामसेवकांची भरती कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोलापूर जिह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी स्वतंत्रपणे एक ग्रामविकास अधिकारी देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील 205 गावांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्या गावांचा कारभार सध्या 160 ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सुरू आहे. बार्शी आणि माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 23 पदे रिक्त आहेत. त्या 45 गावांना पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांची भरती कधी होणार, याकडे त्या गावांचे लक्ष लागले आहे.

17 विभागांतर्गत 900 पदे रिक्त

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 17 विभागांतर्गत जवळपास 900 पदे रिक्त आहेत. त्यात ग्रामसेवकांची 86, तर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील सेवकांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात 649 पदे भरण्यास मंजुरी मिळावी म्हणून शासनाला प्रस्ताव0दिला आहे. त्यानुसार पुढील आठवडय़ात तेवढय़ा पदांची भरती जाहीर होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.