मोदींचा फोटो वापरू देऊ नये! उमेदवाराविरोधात भाजपचीच निवडणूक आयोगाकडे धाव

मोदींचा फोटो प्रचारासाठी वापरू देऊ नये असं म्हणत भाजपने उमेदवाराविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार भाजपमध्येच होता. मात्र आता त्याच्या विरोधात भाजपने तक्रार केली आहे.

कारण, आता हा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. या उमेदवाराचं नाव इश्वरप्पा असं आहे. ईश्वरप्पा हे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आपला मुलगा के. ई. कांतेश याला हावेरी मतदारसंघातून तिकीट मिळावं अशी ईश्वरप्पा यांची अपेक्षा होती. पण, त्याला तिकीट न मिळाल्याने ईश्वरप्पा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

अमित शहा यांनी ईश्वरप्पा यांना नामांकन परत घेण्यासाठी सांगितलं. पण, ईश्वरप्पांनी आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर ईश्वरप्पा यांनी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर केला. त्यावर भाजपने आक्षेप घेतला. यावर ईश्वरप्पा यांनी स्थानिक न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यानुसार, आपल्याला मोदी यांचा फोटो वापरण्यापासून रोखण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेत पंतप्रधान मोदी यांच्या फोटोचा वापर करू देऊ नये, अशी विनंती आयोगाकडे केली आहे.