Lok Sabha Election 2024 : नगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला धक्का, सुजय विखेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे

‘बाहेरच्यांना दिली ओसरी, बाहेरचे हातपाय पसरी’ अशी अवस्था आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची केली आहे. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज असून नगरमध्ये बाहेरच्यांची संख्या वाढली म्हणत भाजप निष्ठावंतांनी सामूहिक राजीनामे देत सुजय विखे-पाटील यांना धक्का दिला आहे.

देशभरात दुसऱया पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा धाक दाखवून भाजपने स्वतःच्या पक्षात सामावून घेतले आणि वर मंत्रीपदाची माळही घातली. आता लोकसभेच्या तोंडावर खासदारकीची उमेदवारी देऊन कहर केल्याने मूळ भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याचा प्रत्यय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आला. त्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत बाहेरच्या उमेदवारांसाठी आम्ही प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले.

बाहेरच्यांसाठी गाढव मेहनत करणार नाही

भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात आधीच पक्षात नाराजी होती. त्यांना उमेदवारी दिल्याने अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांचा कडेलोट झाला आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील शेवगाव येथील भाजपचे पदाधिकारी सुनील रासने यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा देत सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाहेरच्यांसाठी आम्ही गाढव मेहनत करायची का, असा सवालही कार्यकर्ते विचारत आहेत.

विखेंचा ना मतदारांशी संवाद, ना सुविधांकडे लक्ष

डॉ. सुजय विखे-पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदारांच्या सुविधांकडे लक्ष दिले नाही तसेच त्यांनी येथील रहिवाशांशी संवाददेखील साधला नाही, असा आरोप सुनील रासने यांनी केला. विशेष म्हणजे रासने सध्या भाजपचे सरचिटणीस असून त्यांनी शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

नगर दक्षिणमध्ये भाजपचा पराभव होणार

भाजप देशामध्ये चांगली कामगिरी करेल, मात्र त्यामध्ये नगर दक्षिणची जागा नसेल. नगर दक्षिणमध्ये भाजपचा पराभव होणार आहे एवढे निश्चित आहे. याचे दुःख मला आणि मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत राहील, असे रासने यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची फौजेने विखे यांचा पराभव करण्यासाठी पंबर कसली आहे एवढे मात्र निश्चित.

मतदारांचे फोन न उचलणे, पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदारसंघातील जनता, असा समज करून विखे वागत आहेत. त्यामुळेच आता जेव्हा गरज लागली त्यावेळी डाळ आणि साखर वाटत फिरत आहेत. मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती, असा टोला रासने यांनी लगावला. संतापलेल्या रासने यांनी आतापर्यंत भाजप कार्यकर्ता म्हणून त्यांना देण्यात आलेल्या पदांच्या नियुक्तीपत्रकांची फ्रेम करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. हजारो निष्ठावंतांची हीच भावना आहे, असे रासने यांनी स्वतःच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे.