Lok Sabha Election 2024 : भाजपकडून मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर, गडकरी यांची उमेदवारी रद्द करा

भाजप नेते सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग करत आहेत. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केला आहे. या प्रकरणी गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भाजपकडून नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपकडून सुरू असलेला हा प्रकार म्हणजे मतदारांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारा आहे. काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही भाजपकडून या पोस्टर्सचा वापर केला जात आहे. हा प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणूक आयोगाने तत्काळ याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून केली आहे.

– भाजप उमेदवार नितीन गडकरी, आमदार मोहन मते यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी या दोघांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

आचारसंहिता केवळ विरोधकांसाठीच आहे का?

देशभरात लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप सर्व नियम धुडकावत आहे. त्यानंतरही निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करताना दिसत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जाते, पण भाजपा नेत्यांवर कारवाई केली जात नाही. केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही अतुल लोंढे यांनी केला आहे.