Lok Sabha Election 2024 : फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी ठाकूर ठरणार डोकेदुखी

फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी ठाकुरांकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडणार आहे. भाजप आमदाराच्या पुत्रानेच अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे दुर्लक्ष झाल्याने ठाकूर समाज भाजपविरोधात प्रचंड नाराज आहे. यावेळी भाजप उमेदवाराला मत देण्याऐवजी पर्यायी उमेदवाराला भरघोस मतदान करण्याचा निर्णय ठाकूर समाजाने घेतला आहे. परिणामी भाजपविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

ठाकूर समाज भाजपविरोधात गेल्यामुळे भाजप नेतृत्व अत्यंत चिंताग्रस्त आहे. किरावली येथे झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी क्षत्रियांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजप उमेदवाराच्या समाजातील लोकही त्याच्याविरोधात आहेत. याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. क्षत्रिय समाजातही भाजपबद्दल रोष वाढल्याचे चित्र आहे. सिक्रीमध्ये साडेतीन लाख क्षत्रिय असून याचाही फटका निवडणुकीत बसू शकतो. दरम्यान, आग्य्रात 7 मे रोजी मतदान होणार असून येथील प्रचाराची सर्व मदार मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांवर आहे.