‘मनसे’महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱयांच्या पाठीशी

महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱया मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी वल्गना करणारे  ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘मोदी-शहां’ना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राजकीय फायद्यासाठी वारंवार भूमिका बदलणाऱया राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ‘यू-टर्न’ घेतल्यामुळे राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त होत असून ‘मनसे’ कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे ‘मनसे’ कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच तीन आठवडय़ांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तब्बल चौदा तासांच्या ‘वेटिंग’नंतर राज ठाकरे यांना शहांची भेट मिळाली होती. या चर्चेदरम्यान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात होते. मात्र तब्बल तीन आठवडे राज ठाकरे यांनी शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत कोणतेही भाष्य केले नसल्याने जागावाटपावरून चर्चा फिस्कटल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र आज गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मेळाव्यात ‘मोदी-शहां’ना मनसे बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज यांनी केली. दरम्यान, कोणत्याही निवडणुकीत आपला पक्ष ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्याच रेल्वे इंजिन चिन्हावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदीशहांना बिनशर्त पाठिंबा; विधानसभा, पालिकेसाठी सेटिंग’, कार्यकर्त्यांचा मात्र भ्रमनिरास

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ टॅगलाइनखाली मोदींच्या धोरणांची पोलखोल केली होती. मात्र आता अचानक मोदींना पाठिंबा देण्याची घोषणा करीत मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत ‘सेटिंग’ केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवाय मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचेही स्पष्ट झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.

राज ठाकरे म्हणतात

गुजरात दौऱयानंतर देशाला मोदींसारखा पंतप्रधान हवा असल्याचे सर्वप्रथम मी जाहीर केले. मात्र यानंतर अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याने जाहीर टीका करीत टोकाचा विरोध केला. मात्र नरेंद्र मोदींकडूनच आता देशाला अपेक्षा आहेत. त्यामुळे मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मोदींना पाठिंबा देत आहे!