श्रीगोंद्यातील भाजपचे निष्ठावंत खासदार विखेंवर नाराज

sujay-vikhe-patil

गेल्या पाच वर्षांत खासदार सुजय विखे आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून स्वतःची वैयक्तिक यंत्रणा उभी करून ठेकेदार आणि त्यांच्या ठराविक नेत्यांना पोसण्याचे काम केले आहे. ‘आता लोकसभेची निवडणूक आल्यानंतर तुम्हाला आमची आठवण आली का’, असा संतप्त सवाल श्रीगोंद्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपचे नगर शहराध्यक्ष, निवडणूक समन्वयक अभय आगरकर यांना केल्याने त्यांची बोलती बंदच झाली.

श्रीगोंदा तालुक्यातील भाजपच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा अभय आगरकर यांनी बुधवारी (दि. 10) आयोजित केला होता. यावेळी भाजपचे 20 वर्षांपासून काम करीत असलेले पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मागील 5 वर्षांत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते, खासदार सुजय विखे यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आम्ही पक्ष वाढविला, पक्षाचे निष्ठsने काम केले. यांनी पक्षात येऊन सत्ता मिळवली. आमची कधी साधी चौकशीही केली नाही. आता निवडणूक आल्यानंतर तुम्हाला आणि उमेदवारांना आमची आज आठवण झाली का, असा संतप्त सवाल निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी अभय आगरकर यांना केला. त्यामुळे आगरकर निरुत्तर झाले. शेवटी मी सर्वांच्या व्यथा, अडचणी वरिष्ठांच्या कानावर घालतो आणि दोन दिवसांत सक्रीय होण्यासाठी कळवितो, असे सांगून बैठक गुंडाळली.

या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ नेते दादासाहेब ढवाण, राजेंद्र म्हस्के, राजेंद्र मोटे, शिवाजी राऊत, राजाराम वाबळे, बाळासाहेब हिरणवळे, राजेंद्र औटी, किशोर भुते, दत्ता जगताप उपस्थित होते.