अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन! अख्ख्या गावाने दारे लावून घेतली

मराठा समाजाकडून होत असलेला विरोध पाहता भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन फिरत आहेत. लोणी येथे जाहीर सभेपूर्वी पोलिसांनी चक्क सशस्त्र पथसंचलन केले. त्यामुळे संतापलेल्या गावकर्‍यांनी दारे लावून घेतली. अशोक चव्हाणांच्या सभेकडे एकही ग्रामस्थ फिरकला नाही. त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करून चव्हाणांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात कोंढा येथील ग्रामस्थांनी अशोक चव्हाणांना गावातही शिरू दिले नाही. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांनाही प्रचार न करताच माघारी यावे लागले.

जिल्ह्यातील पाटनूर आणि लोणी येथे एकाच दिवशी अशोक चव्हाण यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आंदोलकांचा धसका घेऊन चव्हाणांनी सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला होता. लोणीत सभा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी सशस्त्र पथसंचलन केल्यामुळे गावात प्रचंड दहशत निर्माण झाली. संतापलेल्या गावकर्‍यांनी आपापल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. संपूर्ण गावाने पाठ फिरवल्याने अशोक चव्हाण यांच्यावर सोबत आणलेला फौजफाटा घेऊन माघारी परतण्याची नामुष्की ओढवली.

आजपर्यंत आमच्या गावात कोणताच मोठा गुन्हा घडला नाही. आम्ही सर्व गुण्यागोविंदाने नांदत आलो आहोत. पण या निवडणुकीत आम्ही आक्रित पाहिले नव्हे अनुभवले! गावाने कधीही एवढे पोलीस पाहिले नव्हते. अशोक चव्हाण यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांना येण्या-जाण्यासाठी कधीही कोणी रोखले नाही. येथील मतदार पूर्वीही काँग्रेसचाच होता आणि यावेळीही काँग्रेससोबतच राहील.
– प्रल्हादराव सोळंके, माजी सरपंच, लोणी

मराठा समाजाची फसवणूक करणार्‍या भाजपसोबत अशोक चव्हाण गेले आहेत. आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मतदारांनाही विश्वासात घेतले नाही. चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. पण आरक्षणासाठी त्यांनी काहीही केले नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे निदान कुणबी पुरावे तरी समोर आले. यासर्व कारणामुळेच त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
– सुनील वानखेडे, ग्रामस्थ