खंडणी प्रकरणात मनसे विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष शालोम पेणकर गजाआड

पेण येथील मुद्रांक विक्रेते खंडणी प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर याला देखील पेण पोलिसांनी गजाआड केले आहे. याच प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर याला पेण पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. या सर्व आरोपींना पेण कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शालोम पेणकर व रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी अन्य साथीदारांसह पेण तहसीलदार कार्यालय येथे मुद्रांक विक्रेते हबीब खोत याना दमदाटी केली होती. मात्र शालोम पेणकर, संदीप ठाकूर यांनी मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव टाकत मनसे कार्यालयात बोलवून आरोपी शालोम पेणकर, संदीप ठाकूर, रफिक तडवी यांनी 3 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 लाख खंडणी ठरली. तसेच दरमहा 40 हजार रुपये हप्ता मागितला होता. खंडणी न दिल्यास परवाना रद्द करण्याची व चाकूचा धाक दाखवून जीवाचे ठार मारण्याची धमकी दिली होती.

आरोपींनी 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला. यानंतर मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांनी पेणचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या कडे तक्रार केली. डीवायएसपी शिवाजी फडतरे यांनी  सापळा रचुन दीड लाख रुपये घेताना संदीप ठाकूर, व साथीदाराला अटक केली त्यावेळी शालोम पेणकर व रफिक तडवी यांनी तेथून पळ काढला होता. मात्र पेण पोलिसांनी कसून तपास करून फरार मनसे विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष शालोम पेणकर व रफीक तडवी यांना गजाआड केले.