बच्चू कडू अकोल्यातही भाजपला धक्का देणार; काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता

बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यास ठाम विरोध केला होता. त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता बच्चू कडू आक्रमक झाले असून भाजपला शक्य त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अमरावतीनंतर आता अकोल्यातही बच्चू कडू काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बच्चू कडू भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

अकोल्यात रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू कडू भाजपवर नाराज आहेत. तसेच ते अनेकदा याबाबतची नाराजी स्पष्टपणे व्यक्त करत आहेत. अमरावतीप्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडू यांचा समर्थकांची संख्या जास्त आहे. याआधी विधानसभेवेळी प्रहारच्या उमेदवारांना मिळालेले मतदान लक्षात घेता तर लोकसभेला बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराचे राजकीय गणित बिघडवू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बच्चू कडूंनी अकोल्यात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्याचा परिणाम जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.