बापाला कधी निवृत्त करायचं नसतं….अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांचे चोख प्रतुत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात अजित पवार यांनी वयावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारी कर्मचारी 58 व्या वर्षीच निवृत्त होतात. पण, 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं बोलत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना ‘बापला निवृत्त करायचं नसतं’ असे म्हणत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जनतेच्या अडचणी सोडवणे आणि बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यात आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले की, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो. याच शिकवणीतून आपण पुढे जात आहोत. वय झाल्यानंतर थांबायचे असते. ही वर्षोनुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण, काहीजण ऐकण्यास तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारमधील कर्मचारी 58 व्या वर्षीच निवृत्त होतात. काहीजण 65, 70 आणि 75 व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, 84 वय झालं तरी तुम्ही थांबेना… अरे काय चाललंय काय… आम्ही आहोत ना काम करायला… कुठे चुकलो तर सांगा ना… आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. पाच ते सहावेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बापाला कधी निवृत्त करायचे नसते. बाप हेच घरातील उर्जास्त्रोत असते. आई-बापाविना घर रिकामं वाटायला लागतं, असे आव्हाड यांनी अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.