अजय देवगणच्या `मैदान’ चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, स्थगिती देण्यास दिवाणी न्यायालयाचा नकार

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या `मैदान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे 10 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही पक्षकरांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिवाणी न्यायाधीश ए. झेड. खान यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्या मेहराफ्रिन इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमआयपीएल) हिताचे संरक्षण करण्यासाठी पुढील दोन आठवड्यात 96 लाख रुपयांची बँकेची हमी देण्याचे आदेश प्रतिवादी निर्मात्यांना दिले.

चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या कॅमेऱ्याशी संबंधित उपकरणांचे पैसे न दिल्याबद्दल उपकरणांचे मालक मेहराफ्रिन इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने चित्रपटाचे निर्माते बायव्यू प्रोजेक्ट्स एलएलपी आणि बोनी कपूर यांच्याविरोधात व्यावसायिक अपील दिंडोशी येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयात दाखल केले होते. एमआयपीएलच्या दाव्यानुसार, 1 कोटी सात लाख 21 हजार रुपयांची देय रक्कम प्रलंबित होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ती रक्कम देण्यात येईल, असे निर्मात्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आता 21 टक्के व्याजासह 64 लाख 59 हजार 577 रुपयांची थकबाकी न भरल्यामुळे त्याविरोधात एमआयपीएलने अपील दाखल केले होते आणि जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

मैदान हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. मैदान’ हा चित्रपट भारतातील 1950 ते 1960 या सोनेरी काळावर आधारित आहे. मैदान चित्रपटात भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची कथा दाखवण्यात आली आहे. अजय देवगण, प्रियामणी आणि बोमन इराणी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.