नव्या रूपातलं नवं बाईपण; ‘झिम्मा 2’मधील ‘मराठी पोरी’ गाणे थिरकायला लावणार

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. हटके विषय आणि तगडय़ा स्टारकास्टमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यांना तो त्यांच्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला. त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. आता ‘झिम्मा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातले ‘मराठी पोरी’ या गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून अमितराज याने संगीत दिले आहे. डान्स मूड असलेल्या या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱहाडे यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘झिम्मा’च्या गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली होतीच. त्यामुळे आता ‘झिम्मा 2’मधील संगीताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. हे गाणे प्रत्येकाला थिरकायला लावणारे असून एपंदरीत सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासीयत या गाण्यातून सांगितली आहे. यातून प्रत्येकीची ओळख होते. या सात जणी म्हणजे इंद्रधनुतील सात रंग आहेत आणि हे सात रंग एकरूप झाल्याचा फील या गाण्यातून येतो
तसेच कलाकारांच्या वेशभूषेने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. ‘मराठी पोरी’ हे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते डोळ्यांनाही सुखावणारे आहे. अतिशय एनर्जीने भरलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे आहे.