Marathwada Earthquake – हिंगोलीतील रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र, 1993 नंतरचा सर्वात मोठा भूकंप

21 मार्चची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी भीतीदायक ठरली. पहाटेच्या सुमारास नांगेड, हिंगोली, परभणी जिल्हा एकामागोमाग एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे साखरझोपेत असणाऱ्या नागरिकांनी आणि कामाला जाण्याची तयारी करणाऱ्या नोकरदारांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाच पहिला धक्का बसला. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी मापण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा आणि दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागामध्ये जमिनीच्या आत 10 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून आले.

पहिल्या धक्क्यातून नागरिक सावरत नाही तोच बरोबर 11 मिनिटांनी अर्थात सकाळी 4 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंप मापण यंत्रावर याची नोंद 3.6 रिश्टल स्केल एवढी झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून आवाज येणे, कमी-अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली व वसमत तालुक्यातील अनेक गावांना सकाळी भूकंपाचा हादरा बसला. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडले. सुदैवाने या धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाली, मात्र अनेक घरांना तडे गेले असून काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचेही वृत्त आहे.

हिंगोली शहरातील अनेक भागात भूगर्भातून सौम्य आवाज झाल्याचे जाणवले. तर हिंगोली जिल्ह्यातील 700 हून अधिक गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, पाळोदी, कांडली, बोलक्याची वाडी, कवडा, पोतरा, वडगाव, बोथीमाळ, धावंडा, जांब, सिंदगी, पावनमारी, येडशी, डोंगरगाव सापळे या भागात जाणवले आहेत. तर औंढा नागनाथ तालुक्यातील काकड धाबा पिंपळदरी सोनवाडी फुलदाबा कुपटी, पांगरा शिंदे, वसमत तालुक्यातील हट्टा शिरड शहापूर रंजे अडगाव माटेगाव ब्राह्मणगाव सावंगी आधी गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

“मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.”

श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर