निष्काळजीपणा भोवला, वेरावली जलवाहिनी फोडणाऱ्या मेट्रोला सव्वा कोटीचा दंड

मेट्रो-6 च्या कामात ड्रिलिंग करताना अंधेरी पूर्व सीप्झजवळ शुक्रवारी 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. पश्चिम आणि पूर्व उपनगरातील नऊ परिसरांचा पाणीपुरवठा तब्बल पाच दिवस विस्कळीत झाला होता. त्यामुळे निष्काळजीपणे काम करून जलवाहिनी फोडल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने मेट्रोच्या ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराला 1 कोटी 33 लाख 62 हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवारी तब्बल 50 तासांनी पूर्ण करण्यात पालिकेच्या जल अभियंता विभागाला यश आले.

अंधेरी पूर्व सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ 30 नोव्हेंबरला मेट्रो-6 च्या कामाचे ड्रिलिंग सुरू असताना 1800 मिलिमीटर व्यासाच्या वेरावली जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला धक्का बसला आणि जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, वांद्रे तसेच घाटकोपर, चांदिवली, कुर्ला, भांडुप परिसरांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. अखेर 50 तासांच्या कामानंतर सोमवारी जलवाहिनीची दुरुस्ती झाली, मात्र काही परिसरांत अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशा ठिकाणी पालिकेकडून अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

अशी केली दंडात्मक कारवाई

पाणी वाया गेल्याने – 28,20,830
दुरुस्ती खर्च – 60,87,444,08
50 टक्के अतिरिक्त दंड – 44,54,137
एकूण दंड – 1,33,62,412

‘अदानी’च्या धक्क्याने दहिसरमध्ये जलवाहिनी फुटली

दहिसर पूर्व-चेकनाका येथे अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना पालिकेची पाणीपुरवठा करणारी नऊ इंचाची जल वाहिनी फुटली. या घटनेची माहिती जल विभागाला मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती हाती घेतल्याने पाणीपुरवठा तातडीने सुरळीत झाल्याचे जल विभागाकडून सांगण्यात आले.

दहिसर पूर्व-चेकनाका, हारेम टेक्स्टाईल, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अदानी इलेक्ट्रिसिटीचे केबल दुरुस्तीचे काम सुरू असताना नऊ इंचाची जलवाहिनी फुटली. यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेले. जल विभागातील कर्मचाऱयांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने कुठल्याही विभागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला नसल्याचे जल विभागाकडून सांगण्यात आले.

उद्या फोर्ट ते धारावी पाणीपुरवठय़ावर परिणाम

मलबार हिल सेवा जलाशयाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी जलाशयाच्या पुनर्बांधणी केली जात असून त्यासाठी गुरुवार, 7 डिसेंबरला तज्ञांकडून जलाशयाची अंतर्गत पाहणी केली जाणार आहे. ही पाहणी करण्यासाठी जलाशयाचा दोन क्रमांकाचा कप्प्यातील पाणी उपसून रिकामे केले जाणार आहे. त्यामुळे या जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱया फोर्ट, चिराबाजार, मलबार हिल, दादर-माहीम-धारावी, वरळी-प्रभादेवी परिसरातील पाणीपुरवठय़ाला फटका बसणार आहे. काही परिसरात पाणीकपात तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ञ नागरिक, महापालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचवणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ञ समितीमार्फत गुरुवारी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक-2 ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे

असा असेल पाणीपुरवठा

‘ए’ विभाग

कफ परेड व आंबेडकर नगर – इथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद n नरिमन पॉइंट व जी. डी. सोमाणी – 50 टक्के पाणीपुरवठा बंद n मिलिटरी झोन – 30 टक्के पाणीपुरवठा बंद

सी विभाग

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठय़ात 10 टक्के कपात.

डी विभाग

पेडर रोड – 20 टक्के कपात, मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठय़ात 10 टक्के कपात.

जी-उत्तर आणि जी-दक्षिण विभाग

जी-उत्तर आणि जी-दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणाऱया सर्व विभागांत पाणीपुरवठय़ात 10 टक्के कपात.