वाहतूककोंडी फोडण्याची स्कीम हा मुख्यमंत्री पुत्राचा पॉकेटमनी स्कॅम, मनसे आमदार राजू पाटील यांचा बॉम्बगोळा

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटावी यासाठी सरकारने केलेल्या  ‘स्कीम’ म्हणजे मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पॉकेटमनीसाठीचा ‘स्पॅम’ आहे, असा जबरदस्त बॉम्बगोळा मनसे आमदार राजू पाटील यांनी टाकला. कल्याण-तळोजा मेट्रोसाठी एमएमआरडीएने 1 हजार 878 कोटींची निविदा काढल्यानंतर राजू पाटील यांनी शीळ फाटय़ावरील आजचा पाच किलोमीटर ट्रफिक जामचा गुगल मॅप पह्टो ट्विट करून मिंधेंचा कारभार चव्हाटय़ावर आणला आहे.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी  एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा हल्लाबोल केला होता. त्यानंतर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील मिंधे गटाच्या कारभाराचा पर्दाफाश करत आहेत. एक ‘नाथ’ आहे घरी म्हणून ही मुजोरी? बापाने पॉकेटमनीसाठी एमएमआरडीए, एमएसआरडीसीचा निधी दिल्यामुळे करोडोच्या बाता मारल्या जात आहेत. या निधीमुळे कल्याण, डोंबिवलीच्या समस्या मात्र सुटल्या नाहीत. रेल्वेच्या प्रवाशांना तर रोज मरणयातना भोगाव्या लागतात, असा हल्लाबोल आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटच्या माध्यमातून करत मिंधेंचा खरपूस समाचार घेतला होता. आज पुन्हा एकदा पाटील यांनी  वाहतूककोंडीवरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना खडे बोल सुनावले. शीळफाटय़ावरील वाहतूककोंडीमुळे  त्रस्त असलेल्या नागरिकांच्या नाराजी, संताप आणि मनःस्तापाला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून वाट मोकळी केली. विशेष म्हणजे आजच एमएमआरडीएने कल्याण-तळोजा मेट्रोसाठी 1 हजार 878 कोटींची निविदा काढल्यानंतर राजू पाटील यांनी केलेल्या ‘पॉकेटमनी’ ट्विटची कल्याणमध्ये खमंग चर्चा सुरू आहे.

‘ट्विटर हल्ला’

शीळफाटय़ाच्या वाहतूककोंडीने स्वतःचेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत. वाहतूककोंडी सुटावी यासाठी रोज नवनव्या ‘स्कीम’ घेऊन येतात. त्या स्कीम नसतातच, पॉकेटमनीसाठी केलेला स्पॅम असतो, अशा चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गर्भवती माता, वृद्ध, रुग्ण सगळे तासन्तास ट्रफिकला सामोरे जातायत. तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधी तरी आमच्या सूचनांचा विचार करा, कदाचित वाहतूककोंडी कमी होईल. पाहिजे तर श्रेय तुमच्या सुपुत्राला घेऊ द्या, पण एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शीळफाटय़ाच्या ट्रफिक जामचा शिक्का तेवढा पुसा.

राजू पाटील, आमदार

75 टक्के रक्कम जाते कुठे याचा तपास करा – भाजप

मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही आज विकासकामावरून अप्रत्यक्षरीत्या शिंदे गटावर हल्ला चढवला. विविध विकासकामे आणि समस्यांबाबत गायकवाड यांनी केडीएमसीच्या नवनियुक्त आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून पालिकेला मिळणाऱ्या निधीतील 25 टक्के रक्कमसुद्धा विकासकामावर खर्च होत नाही, मग हा पैसा जातो कुठे याचा तपास झाला पाहिजे, असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केले.