चक्कर आल्याने कट्टय़ावर झोपलेल्या तरुणाचा मोबाईल चोरला

चक्कर आली म्हणून कट्टय़ावर बसलेल्या तरुणाला तथेच झोप लागली. मग हीच संधी साधत एका चोराने त्या तरुणाच्या खिशातला मोबाईल चोरून पळ काढला. तो सटकला, पण वडाळा पोलिसांनी शोधून त्याला पकडला. आरोपीने एक मोबाईल चोरला, पण पोलिसांनी त्याच्याकडून पाच मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली. वडाळय़ाच्या शिवशंकर नगरात राहणारा सचिन साळुंखे (37) हा तरुण चक्कर आल्याने नाडकर्णी पार्क येथील स्कायवॉकच्या कट्टय़ावर बसला आणि तेथेच त्याला झोप लागली. त्यावेळी अज्ञात चोराने सचिनच्या खिशातील मोबाईल काढून पळ काढला. याप्रकरणी सचिनने तक्रार दिल्यानंतर वडाळा पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा अशा प्रकारे चोरी करणारा एंटोफिल वेअर हाऊसजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी विशाल काळे (27) याला पकडले.