गुजरात आणि दिल्लीतून औरंगजेबी वृत्ती महाराष्ट्रावर चाल करून येतेय; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची भव्य जनसंवाद सभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सिंदखेडराजामध्ये झाली. या सभेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खणखणीत भाषण करत शिवसैनिकांमध्ये जोश भरला. महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे तर, देशाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र अशा जागेवर शिवसेना मेळावा होतोय. या मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ज्या राजमातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या ओटीत दिले, त्या जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी जाऊन आपण दर्शन घेतले. अत्यंत पवित्र अशी ही जागा आहे. हा राजवाडा नाही तर, हे महाराष्ट्राचं, या हिंदुत्वचं, या हिंदवी स्वराज्याचं तिर्थक्षेत्र आहे. या तिर्थक्षेत्रात गद्दारीची बिजं कधी रुजणार नाही. इथे गद्दार गाडले जातील. इथे बेईमानांना थारा नाही. अशा प्रकारची ही पवित्र माती आणि पवित्र भूमी आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गद्दारांवर हल्लाबोल केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होण्यापूर्वी बालशिवाजींची पावले या भूमीवर उमटलेली आहेत. छत्रपती शिवाजीराजेंना घडवले कोणी? श्रेय अनेकजण घेतात. पण त्यांना घडवणारी राजमाता जिजाऊ माता होती. हे अख्ख्या देशाने किंवा जगाने मान्य केले आहे. अशा या पवित्र मातेच्या जन्मभूमीवर आपण सर्वांनी शिवसेनेचा स्वाभिमानाचा भगवा झेंडा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण फडकवत ठेवला. त्या भगव्या झेंड्याला कलंक लावण्याचे काम काही लोकांनी केले. त्यामुळे मला खात्री आहे की, आपण सगळे एका निर्धाराने, ज्यांनी या शिवरायांच्या मातीला कलंक लावला. त्यांना ह्याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

मला आठवतंय, हे मातृतिर्थ सिंदखेडराजाच्या विकासासाठी उद्धव ठाकरेसाहेब हे मुख्यमंत्री असताना विशेष प्रयत्न केले होते. आणि त्याच मातृतिर्थावर आपण आज जमलेलो आहोत. या मातीचं महत्त्व असं आहे, या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शहा असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्मानला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

जे-जे या महाराष्ट्रावर चाल करून आले, ज्यांनी-ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझल खान असेल, त्या सगळ्यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचे काम इतिहासात झालेले आहे. त्यामुळे आताही कोणी त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थानप झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत ती शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

याद राखा… महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपवण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला. शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले, कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचे आहे, महाराष्ट्र विकायचा आहे, मुंबई विकायची आहे. उद्योगपतींच्या घशात घालायची आहे. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही. जोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेना पुढे घेऊन जाईल. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे, मग महाराष्ट्र तोडू, मुंबई तोडू, अशा प्रकारचे कारस्थान दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केले आहे. आपल्याला त्याला तोंड देऊन, संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे, अशी कडाडून टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत. त्यावर माननीय उद्धवजी ठाकरे बोलतील. पण शेवटी इतकचं सांगतो… अले किती, गेले किती संपले भरारा… पण उद्धव ठाकरे तुमच्या नावाचा अजूनही दरारा… म्हणून हे सगळे आपल्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. पण आपण लढत राहू. संघर्ष करू आणि या महाराष्ट्रातली बेईमानी कायमची गाडू, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.