रशियावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला, 60 जणांचा मृत्यू; ISIS ने घेतली जबाबदारी

रशियाची राजधानी मॉस्कोवर 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 60 नागरिकांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर मोस्कोमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मॉस्कोतील प्रसिद्ध कॉन्सर्ट हॉल क्रोकस सिटीमध्ये 22 मार्चच्या सायंकाळी हा हल्ला झाला. हा हल्ला झाला तेव्हा कॉन्सर्ट हॉलमध्ये हजारो नागरिक उपस्थित होते. चार ते पाच बंदुकधारी दहशतवादी कॉन्सर्ट हॉलमध्ये शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामुळे जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू झाली.

दहशतवाद्यांकडे ऑटोमेटिक कलाश्र्निकोव्ह रायफल होती. यातून निघालेल्या गोळ्यांनी शेकडो नागरिकांचा वेध घेतला. काही कळायच्या आता कॉन्सर्ट हॉलमध्ये मृतांचा खच पडला. आतापर्यंत या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून शेकडो लोकं जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संपूर्ण परिसराचा ताबा रशियन मिलिटरीने घेतला आहे.

दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी कलाश्र्निकोव्ह रायफल वापरली असून रशियन भाषेत याला ‘कलश’ असेही म्हणतात. सोव्हियत काळामध्ये 1974मध्ये ही रायफल बनवण्यात आली होती. याला एके-74 रायफलही म्हणतात. हल्ल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेले मॅकझीन, जॅकेट आणि बुलेट्स आढळून आल्या आहेत. यासाठी दहशतवाद्यांनी घटनास्थळी सोडून दिलेले हत्यारंही जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हा हल्ला केल्यानंतर दहशतवादी आपल्या अड्ड्यावर परतल्याचा दावा इसिसने आपल्या कथित टेलिग्राम चॅनलवरून केला आहे. अर्थात हा दावा कितपत खरा याबाबत संशय आहे. मात्र अद्याप एकाही दहशतवाद्याला अटक किंवा ठार करण्यात आल्याचे वृत्त नाही.

मोदींनी केला निषेध

मॉस्कोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. “आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत असून या दु:खाच्या काळात हिंदुस्थान रशियासोबत उभा आहे”, असे मोदींनी म्हटले.