16 महिन्यात महिलेला 5 वेळा हृदयविकाराचा झटका, डॉक्टरही चक्रावले

हृदयविकाराचा धक्का हा कोणत्याही माणसासाठी एक भीतीदायक घटना असते. मुलुंडमध्ये राहणाऱ्या 51 वर्षांच्या सुमित्रा (बदललेले नाव) यांना गेल्या 16 महिन्यांत 5 वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. सुमित्रा यांच्यावर शस्त्रक्रिया करून पाच स्टेंट बसवण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्यावर सहावेळा अँजिओप्लास्टी आणि एक कार्डियाक बायपास सर्जरी करण्यात आली आहे. 1 ते 2 डिसेंबर दरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका वारंवार का येत आहे हा प्रश्न या सुमित्रा यांच्यासह डॉक्टरांनाही पडला आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये जयपूरहून बोरिवलीला परतत असताना सुमित्रा यांना ट्रेनमध्ये पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना अहमदाबाद येथील सार्वजनिक रुग्णालयात नेले. डॉ. हसमुख रावत यांनी सुमित्रा यांच्या दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया केली आहे. ते सुमित्रा यांच्यावर जुलैपासून उपचार करत आहेत. सुमित्रा यांना हे हृदयविकाराचे झटके का येत आहे, याचे ठोस उत्तर डॉक्टरांनाही अद्याप मिळालेले नाही. काही तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे की सुमित्रा यांना हृदय विकार नसून त्यांना व्हॅस्क्युलायटिससारख्या विकारामुळे त्रास होत आहे. यामध्ये रक्तवाहिन्या सूजतात आणि रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. सुम्तिरा यांच्या तपासण्यांमध्ये त्यांना होत असलेल्या त्रासामागचे नेमके कारण अजून कळू शकलेले नाही.

सुमित्रा यांना दर काही महिन्यांनी, हृदयविकाराच्या झटका आल्याची लक्षणे दिसतात. छातीत दुखणे, सतत ढेकर येणे आणि अस्वस्थता ही त्यांना जाणवणारी काही लक्षणे आहेत. सुमित्या यांनी सांगितले की, ‘मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता.’ सुमित्रा यांना मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचे वजन 107 किलो होते. आज त्यांचे वजन 30 किलोंनी कमी झाले आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहावे यासाठी त्यांना ‘PCSK9 इनहिबिटर’ नावाचे इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यांचा मधुमेह देखील नियंत्रणात आहे. असे असतानाही सुमित्रा यांना हृदयविकाराचे झटके येत आहेत.

हृदयविकाराच्या रुग्णांना एकाच ठिकाणी वारंवार ब्लॉकेजेस निर्माण होणे ही काही नवी बाब नाहीये. मात्र सुमित्रा यांच्या शरीरात विविध ठिकाणी ब्लॉकेजेस तयार होत आहेत. सुमित्रा यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी उजवी रक्तनवाहिनी 90 टक्के ब्लॉक होती. यामुळे त्यांना पहिला झटका आला होता. दुसरा हृदयविकाराचा झटका हा हृदयाला रक्तपुरवठा करणारी उजवी वाहिनी 99% ब्लॉक झाल्याने आला होता. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.